बनावट कागदपत्राच्या आधारे कारसाठी घेतले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:27 PM2018-09-20T17:27:17+5:302018-09-20T17:28:50+5:30
बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेकडून कारखरेदीसाठी कर्ज घेऊन बँकेला तब्बल ९ लाख २ हजार ९६४ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले.
औरंगाबाद: बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेकडून कारखरेदीसाठी कर्ज घेऊन बँकेला तब्बल ९ लाख २ हजार ९६४ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी क्र ांतीचौक पोलीस ठाण्यात कर्जदारांसह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
कृष्णा धनसिंग ठाकुर, सुजीत सुनील देशमुख , बँक कर्मचारी सचिन बेले आणि जनार्दन सानप अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, अदालत रस्त्यावर इंडसंइड बँक आहे. तक्रारदार भागवत प्रभाकर दसपुते हे बँकेचे व्यवस्थापक आहे. आरोपी कृष्णाने भागवत यांच्याबँकेकडून जून महिन्यात कारखरेदीसाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्जाच्या पहिलाच हप्ता आरोपींनी भरला नव्हता. ही बाब भागवत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने बँक कर्मचाऱ्यांनी कर्जदार ठाकूर याने दिलेल्या पत्त्यावर जाण्याचे सांगितले.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी ठाकुरच्या पत्त्यावर जाऊन पाहिले असता तेथे कृष्णा ठाकुर नावाचा कोणताही व्यक्ती राहात नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सहकर्जदार देशमुख यांना शोधू काढले तेव्हा त्यांनी सांगितले की, कृष्णा ठाकुर नावाच्या व्यक्तीला ते ओळखत नाही. एवढेच नव्हे तर ते कोणत्याही कर्जासाठी सहकर्जदार नाहीत. त्यांनी कर्ज घेण्यासाठी एका खाजगी एजंटला कागदपत्रे दिले होते, त्या कागदपत्राचा दुरूपयोग करून हे कर्ज घेण्यात आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आरोपींनी बँकेला फसविल्याची तक्रार भागवत यांनी नोंदविली. उपनिरीक्षक जी.पी.सोनटक्के तपास करीत आहे.