बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 03:40 PM2019-09-07T15:40:06+5:302019-09-07T15:40:47+5:30
बचत गटांमुळे पासपोर्टवर अंगठा असलेल्या महिला अमेरिकेत पोहोंचल्या
औरंगाबाद : महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. तसेच बचत गटांचा राज्यातील ३९ जिल्ह्यात पसरले आहे. पासपोर्टवर अंगठा असलेल्या महिला अमेरिकेत जाऊन बचत गटांच्या उत्पादनांचे विपणन करत आहेत असेही मुंडे यावेळी म्हणाल्या. त्या महिला बचत गट मेळावा आणि ऑरिक सिटी लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला बचत गटांमार्फत एक चळवळ उभी करण्यात आली आहे. त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी राज्य शासन, बँकांनी पाठबळ दिले आहे. २०१४ मध्ये १० जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू होते. आता २४ जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू आहे. ५० ब्लॉक होते. आता ३५१ झाले. ११७७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत हे काम सुरू होते. आता २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये काम सुरू आहे. ४३ कोटी ४८ हजार कुटुंबांचा यात समावेश आहे. अभियानांतर्गत ५२४ कोटी ८५ लाख समुदाय निधी देण्यात आला. बँकांमार्फत ५ हजार २४९ कोटींचे कर्ज दिले.
महिलांना शाश्वत शेती, भाजीपाला लागवड, फलोत्पादन, शेळीपालन, मासेमारी, कुक्कुटपालन, म्हशी पालन आदी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत २७ हजार ९५० युवक-युवतींना तर इतर योजनेत १ लाख १५ हजार तरुणांना रोजगार देण्यात आला. बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारात मोठी किंमत मिळत आहे. अमेरिकेपर्यंत त्यांच्या मालाचे कौतुक झाले आहे. बचत गटांच्या महिलांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आदी कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.