दिव्यांगांना पन्नास हजारांपर्यंत कर्ज; वर्षाला दोन टक्के व्याज, असा करा अर्ज
By स. सो. खंडाळकर | Published: January 27, 2024 06:27 PM2024-01-27T18:27:08+5:302024-01-27T18:28:05+5:30
अर्जदार कोणताही व्यवसाय करू शकतो. व्यवसायाचे कोणतेही बंधन नाही.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे वैयक्तिक थेट कर्ज योजना व दीर्घ मुदतीची कर्ज योजना अशा दोन योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांगांना दोन टक्के व्याजाने ५० हजारांपर्यंत व वार्षिक ५ ते ९ टक्के व्याज दराने पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे निधी नसल्याने २०१६ ते २०२१ पर्यंतची २५० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येत आहे. २०२३ साली ७०० अर्ज आले होते. त्यापैकी ६५ प्रकरणे मंजुरीसाठी मुंबईला पाठवण्यात आली. आता मंजुरीपत्रे येत आहेत. पाच लाखांसाठी अधिक अर्ज येत आहेत. कारण ५० हजारांत एखादा व्यवसाय उभा राहू शकत नाही.
दिव्यांगांना ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत कर्ज
वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत ५० हजार रुपये व दीर्घ मुदती कर्ज योजनेअंतर्गत ५ लाख रुपये कर्ज मिळते.
वर्षाला दोन टक्के व्याज
५० हजारांच्या कर्जासाठी २ टक्के व ५ लाखांच्या कर्जासाठी ५ ते ९ टक्के व्याजदर आहे.
कोणकोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज?
अर्जदार कोणताही व्यवसाय करू शकतो. व्यवसायाचे कोणतेही बंधन नाही.
कागदपत्रे काय लागतात?
अपंगत्व प्रमाणपत्र, १५ वर्षे वास्तव्याचे प्रमाणपत्र, टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसे प्रमाणपत्र, युडी आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, रेशन कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, इतर कुणाकडून कर्ज न घेतल्याचे शपथपत्र, कोटेशन, असल्यास अनुभव प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायसन, प्रोजेक्ट रिपोर्ट अशी एकूण कागदपत्रे लागतात.
अर्ज कोठे करणार?
डब्ल्यूडब्ल्यूडॉटएमएसएचएफडीसीडॉटकोडॉटइन या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे. त्यानंतरची प्रक्रिया ऑफलाइनच करावी लागते.
कर्ज फेडण्यावर भर द्यावा
थकीत कर्जदार लाभार्थी कर्जाची रक्कम भरत नसल्याकारणाने नवीन अर्जदारास कर्ज देणे शक्य होत नाही. कारण छत्रपती संभाजीनगर कार्यालयाची कमीत कमी थकीत रक्कम ६ कोटी ५२ लाख रुपये आहे. त्यामुळे नवीन कर्जदारास लवकर कर्ज देणे शक्य होणार नाही, असे मुख्यालयातून कळवण्यात आले आहे. महामंडळाचे जे थकीत असलेले दिव्यांग लाभार्थी आहेत, त्यांनी कर्ज फेडण्यावर भर द्यावा.
- ए. यु. शेख, डीएम व एन. बी. वैष्णव, वसुली निरीक्षक.