टँकर वाढीसाठी लॉबी सक्रिय
By Admin | Published: May 8, 2017 12:24 AM2017-05-08T00:24:50+5:302017-05-08T00:25:27+5:30
बीड : ग्रामीण भागात टंचाई असल्याचे भासवून टँकरची संख्या वाढविण्यासाठी टँकर लॉबी सक्रीय झाली आहे.
व्यंकटेश वैष्णव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ग्रामीण भागात टंचाई असल्याचे भासवून टँकरची संख्या वाढविण्यासाठी टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. दोन दिवसापूर्वी बीड तालुक्यातील एका गावचा टँकर मागणीचा प्रस्ताव स्थळ पहाणी नंतर रद्द करण्यात आला. कृत्रीम पाणी टंचाई निर्माण करून टँकर वाढविण्याचा उद्योग सुरू केला आहे. मात्र दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी टँकर मंजूरी संदर्भात समन्वय समिती स्थापन केली आहे.
गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे जलयुक्त योजने अंतर्गत झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला होता. २०१५ - १६ मध्ये जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने सातशेवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदाची जिल्ह्यातील स्थिती वेगळी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याची बऱ्यापैकी स्थिती आहे. परंतु जिल्ह्यातील टँकर लॉबी टँकरची संख्या वाढविण्यासाठी सरसावली आहे. काही गावातील सरपंच व ग्रामसेवकांना हाताशी धरून संबंधीत गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे चित्र निर्माण करण्याचा उद्योग केला जात असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात एकूण ११ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये धारूर तालुक्यात ६ , पाटोदा १, केज १ यासह इतर ठिकाणी ३ असे एकूण ११ टँकर सुरू आहेत. यामध्ये विश्वासनीय सुत्राने दिलेल्या माहितीनुसार ११ पैकी ७ टँकर शासनाचे आहेत. काही गावांमध्ये मात्र खरोखरच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तेथे टँकर सुरू आहेत.