मुंबईच्या ४ गांजा तस्करासह स्थानिक आरोपी जेरबंद; १५ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 06:13 PM2021-01-27T18:13:45+5:302021-01-27T18:14:52+5:30
आरोपींकडून १५ किलो गांजा आणि कार, दुचाकी जप्त करण्यात आली.
औरंगाबाद: मुंबईहून शहरात गांजासह आलेले ४ तस्कर व स्थानिक खरेदीदाराला सापळा रचून पोलीस आयुक्तांच्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून १५ किलो गांजा आणि कार, दुचाकी जप्त करण्यात आली.
अब्दुल गफार खान अब्दुल करीम (३७, रा . कैसर कॉलनी), कारचालक इमरान मोहम्मद हनीफ बलोच (३७, रा. जनता कॉलनी, अंधेरी पश्चिम , मुंबई), शफिक नबी पटेल (२६, जनता कॉलनी,अंधेरी ), अब्दुल गणी जहाॅँगीर शेख (२३,रा.मुंबई ) आणि एक महिला अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार चंपा चौक ते चेलीपुरा रस्त्यावर गांजाची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली. यानंतर त्यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार एस.जे. सय्यद., ए.आर.खरात, व्ही. आर. निकम, व्ही.जे. आढे, महिला हवालदार श्रुती नांदेडकर यांनी रविवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास चंपाचौक ते चेलीपुरा रस्त्यावर सापळा रचला.
तेव्हा संशयित कार तेथे येऊन थांबली याचवेळी दुचाकीस्वार आला. कारमधील आरोपींनी दुचाकीस्वाराला चार पाकीट दिले. हे पाकीट घेऊन तो शहाबाजारकडे निघताच त्याला आणि कारमधील आरोपींना पोलिसांनी पकडले. पंचासमक्ष आरोपीच्या वाहनाची झडती घेतली असता. दुचाकीस्वाराजवळील चार पाकिटात गांजा आढळला. या गांजाचे वजन केले असता ते १५ किलो १६९ ग्रॅम भरले. कारमधील गांजा तस्कर आरोपीसह दुचाकीचालक स्थानिक गांजाचा खरेदीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.