ओबीसी आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:03 AM2021-06-04T04:03:27+5:302021-06-04T04:03:27+5:30
औरंगाबाद : ओबीसी आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता कामा नये असे ऑल इंडिया मुस्लीम ...
औरंगाबाद : ओबीसी आरक्षण बहाल होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता कामा नये असे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत बजावले.
त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात राज्य सरकारने हलगर्जीपणा करून १५ महिन्यांत काहीच केले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २७ टक्के मिळणारे आरक्षण गमावले गेले. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने लवकर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून आपली बाजू न्यायालयात मांडावी. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नये. आरक्षणाचा निर्णय सरकारने लवकर घेतला नाही तर संघटना राज्यात येत्या पंधरा दिवसांत मोठे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
त्यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यांहून जास्त गेल्याचे निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देऊनही सरकारने आपली बाजू मांडली नसल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. दुर्बल घटकातील ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही संधी होती. ती आता नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. भाजपा आणि काँग्रेसवरही त्यांनी यावेळी टीका केली. यावेळी गजनफर जावेद, महेबूब खान, अब्दुल कय्यूम नदवी यांची उपस्थिती होती.