स्थानिक गुन्हेगारांनी उच्छाद मांडला, त्यात अहिल्यानगर, पुण्याहून चोरांच्या टोळ्या छ. संभाजीनगरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:23 IST2025-02-11T13:23:26+5:302025-02-11T13:23:36+5:30

रविवारी तासाभरात बेगमपुऱ्यासह मिल कॉर्नरवर दोन घटनांमध्ये चार चोरांना पकडून नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Local criminals staged a ruckus, including gangs of thieves from Ahilyanagar, Pune in Chhatrapati Sambhajinagar | स्थानिक गुन्हेगारांनी उच्छाद मांडला, त्यात अहिल्यानगर, पुण्याहून चोरांच्या टोळ्या छ. संभाजीनगरात

स्थानिक गुन्हेगारांनी उच्छाद मांडला, त्यात अहिल्यानगर, पुण्याहून चोरांच्या टोळ्या छ. संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे स्थानिक गुन्हेगारांनी शहरात उच्छाद मांडलेला असताना बाहेरील जिल्हे, राज्यातून गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात येऊन गुन्हे करत आहेत. रविवारी तासाभरात बेगमपुऱ्यासह मिल कॉर्नरवर दोन घटनांमध्ये चार चोरांना पकडून नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

अबूर खान आसिफ खान पठाण या युवकाला नातेवाईकाला १ लाख रुपये ऑनलाईन पाठवायचे होते. रविवारी रात्री ११ वाजता ९९ हजार रोख घेऊन तो उर्वरित १ हजार रुपये काढण्यासाठी जुबिली पार्कच्या एटीएम सेंटरवर गेला. दोनदा प्रयत्न करूनही पैसे निघाले नाहीत. खात्यातून मात्र पैसे कमी झाले हाेते. तो तेथेच थांबला. तेवढ्यात तेथे कारमधून तिघांनी येत त्यांच्याकडील चावीने एटीएम उघडून त्यात जमा झालेली रोख घेऊन मिल कॉर्नरच्या दिशेने निघाले. संशय आल्याने अबूर खानने त्यांचा पाठलाग करत एमएसईबीच्या मुख्य कार्यालयासमोर अडवून विचारणा केली. तेव्हा आरोपींनी झटापट करत त्याच्याकडील ९९ हजार रोख हिसकावून घेत कार वेगाने पुढे नेली. ते लिंबरास मध्ये घुसल्याचे अबूर खानने पाहिले.

अबूर खानचे काका व पोलिस दलात कार्यरत फेरोज खान पठाण यांना हा प्रकार कळताच त्यांनी हॉटेलमध्ये धाव घेतली. नंतर सिटी चौक पोलिसांनी धाव घेतली. मात्र त्या धावपळीत ९९ हजार रोख घेतलेला पिंटू नामक चोर कारसह निसटला. त्याचे साथीदार संजय शिवअवतार साहू (१९), अमनसिंग रमाकांतसिंग ठाकूर (२०, दोघेही कानपूर, उत्तर प्रदेश) सापडले. त्यांना अटक करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी एन-७ मध्ये अशाच प्रकारे एटीएम सेंटर लुटण्यासाठी उत्तर प्रदेशहून आलेले मुकिया खान फेकू खान व प्रशांत महाकाल शेट्टी हे रंगेहाथ हाती लागले होते.

काय करतात या टोळ्या?
-एटीएममधून पैसे निघतात, त्याठिकाणी चाेर पट्टी लावतात. ज्यामुळे कार्डधारकाने पैसे काढण्यासाठी प्रक्रिया केली. तरी ते पैसे पट्टीमुळे अडकून राहतात. खात्यातून मात्र पैसे काढल्याची नोंद होते.
- कार्डधारकांना बिघाड झाल्याचे वाटते आणि ते निघून जातात. तेथेच उभे चोर तत्काळ आत जाऊन दुसरी पट्टी आत टाकून ते पैसे बाहेर काढतात. मुकिया व प्रशांत अशाच प्रकारे पैसे लुटत होते.

कर्ज फेडण्यासाठी चोरांसोबत शहरात आले
व्यावसायिक फैजान शाह यांच्या घरात रविवारी रात्री ९ वाजता दोन बुरखाधारी तरुणांनी घरात प्रवेश केला. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच आरडाओरड झाली. तरुणांसह घराखाली दुचाकीवर थांबलेल्या त्यांच्या साथीदारांनी पळ काढला. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. घराखाली उभे विशाल राजेंद्र कवडे व विजय राजू चव्हाण हाती लागले, तर बुरखाधारी तरुण पळून गेले. घटनेची माहिती कळताच बेगमपुऱ्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी धाव घेत त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका करत अटक केली. मात्र, तोपर्यंत स्थानिकांनी त्यांना बेदम चोप दिला होता. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

डोक्यावर कर्ज, गुन्हेगारांची मदत
विशाल नेवाशाचा असून गाड्यांचे कुशनचे सीट तयार करतो, तर विजय पुण्यात एका आर्किटेक्टच्या कार्यालयात चपराशी आहे. त्यांच्या परिचयातील दोघांनी त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून शहरात गुन्हा करण्यासाठी आणले होते.

Web Title: Local criminals staged a ruckus, including gangs of thieves from Ahilyanagar, Pune in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.