स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 07:25 PM2019-08-17T19:25:50+5:302019-08-17T19:27:48+5:30
सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट
औरंगाबाद : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था १९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिंगणात दोनच प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांशी कोणत्याही उमेदवाराने संपर्क साधला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री सेना उमेदवाराने काही एमआयएम नगरसेवकांची भेट घेतली. आज मध्यरात्री अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मागील साडेचार वर्षांपासून मनपातील नगरसेवक चातकासारखी वाट पाहत होते. आपल्या कार्यकाळात ही निवडणूक होते किंवा नाही अशीही भीती अनेकांना वाटत होती. अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. आचारसंहिता लागू झाली. सेनेकडून अंबादास दानवे तर काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांचे नाव निश्चित झाले. निवडणूक रिंगणात दोघेच उमेदवार प्रमुख आहेत. अलीकडेच दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन ‘घोडेबाजार’ करणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मागील पंधरा दिवसांपासून अपक्ष, एमआयएम नगरसेवकांची चलबिचल वाढली होती. दरम्यान, एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी सदसद्विवेक बुद्धीने कोणालाही मतदान करा, अशी मुभा नगरसेवकांना दिली.
पक्षाने स्वातंत्र्य दिल्याने नगरसेवकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. निवडणूक रिंगणातील एकही उमेदवार त्यांच्याशी संपर्क करीत नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत कोणी संपर्क न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निश्चयही एमआयएम नगरसेवकांनी व्यक्त केला होता.
अखेर गुरुवारी रात्री सेना उमेदवार अंबादास दानवे यांनी कटकटगेट भागातील काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शुक्रवारी मध्यरात्री एका ठिकाणी सर्व एमआयएम नगरसेवक एकत्र बसणार आहेत. या बैठकीत अंतिम ‘निर्णय’होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
अपेक्षित ‘मानपान’अशक्य
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दरवेळी घोडेबाजार ठरलेला असतो. मागील दहा वर्षांमध्ये या निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना ही निवडणूक लढविणे अशक्य झाले होते. यंदा निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांनी घोडेबाजारच्या मुद्यावर युती केली. ४त्यानंतर सोयीनुसार घोडेबाजार सुरू केला. नगरसेवकांना अपेक्षित ‘मानपान’आज तरी मिळणे अशक्य झाले आहे.