चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:22 PM2018-07-06T18:22:13+5:302018-07-06T18:23:08+5:30
आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने येथून परतली.
औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न १३९ दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग तसेच असून, पावसामुळे त्यातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आहे. बुधवारी चिकलठाण्यातील जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे कचऱ्याने भरलेली पालिकेची वाहने परत आली. गुरुवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांनी तेथील नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी प्रक्रिया मशिन्स बसवा, त्यानंतरच कचऱ्याची वाहने याठिकाणी आणा, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. परिणामी पालिकेच्या कचऱ्याने भरलेली वाहने परतली.
नारेगाव-मांडकी कचरा डेपो १३९ दिवसांपासून बंद झाल्यामुळे शहराची कचराकोंडी झाली आहे. हर्सूल, चिकलठाणा, कांचनवाडी आणि पडेगाव या परिसरात कचरा टाकण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे मनपाला माघार घ्यावी लागली. चिकलठाण्यातील दुग्धनगरीच्या जागेत मनपा कचरा आणून टाकत आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया करीत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे, त्यामुळे यापुढे कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. महापौरांसोबत शहर अभियंता एस. डी. पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
यावेळी माजी नगरसेवक संजय चौधरी, बाळासाहेब दहीहंडे, दिगंबर कावडे, नीलेश कावडे, संतोष रिठे, कचरू कावडे, संजय गोटे, नारायण गव्हाणे आदी नागरिकांची उपस्थिती होती. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी निश्चित केलेल्या जागांपैकी हर्सूल व चिकलठाणा येथील जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उभा राहिला.
मनपासह समितीला अपयश
कचऱ्याच्या विल्हेवाटीप्रकरणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यात पालिकेला आणि विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला पूर्णत: अपयश आले आहे. समितीने हळूहळू या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. मनपाला आयुक्त मिळाल्यानंतर समितीने कागदोपत्री बैठका घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत.
आता रोगराईची भीती
शहरातील प्रत्येक कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे तो कचरा आता रोगराईला आमंत्रण देणारा ठरणार आहे. हे सगळे होत असताना पालिकेला १३९ दिवसांत कचरा प्रक्रियेसाठी एक जागा शोधता आलेली नाही. ओला व सुका कचरा विघटन याबाबत जनजागृती करणाऱ्या संस्थाही गायब झाल्याचे दिसते आहे.