सलीम अली सरोवराच्या गेटचे कुलूप एमआयएमने तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:47 PM2018-05-03T16:47:12+5:302018-05-03T16:53:13+5:30
खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही वर्षांपासून सलीम अली सरोवराला कुलूप लावण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरोवराचे गेट कटर लावून तोडले.
औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही वर्षांपासून सलीम अली सरोवराला कुलूप लावण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरोवराचे गेट कटर लावून तोडले. यानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे सरोवरात प्रवेश केला. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. एमआयएमच्या या बेकायदेशीर कृतीचा संपूर्ण अहवाल खंडपीठालाही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
महापालिकेने पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून सलीम अली सरोवराचा परिसर सुशोभित केला. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश शुल्कही आकारण्यात येत होते. महापालिकेला महिना अडीच ते तीन लाख रुपये महसूल प्राप्त होत होता. सरोवरासाठी नेमलेल्या जैव विविधता समितीने मनपाच्या कामकाजावर आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली. सरोवराचा संपूर्ण परिसर पक्ष्यांसाठी आहे. विदेशातून येथे पक्षी येतात. नागरिकांचा येथे राबता वाढल्यास पक्षी येणार नाहीत. मनपाने येथे केलेली मोडतोडही योग्य नसल्याचा दावा समितीने केला. न्यायालयाने याप्रकरणी स्थगिती आदेश दिले. तेव्हापासून सरोवराला कुलूप लावले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून समितीला विश्वासात घेऊन कुलूप उघडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेकदा प्रयत्नही केले. मात्र त्याला यश आले नाही.
मजलीस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे नगरसेवक तथा मनपातील गटनेते नासेर सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर मंगळवारी सरोवराचे कुलूप उघडण्यात येणार असल्याची घोषणा केली. सायंकाळी कटर लावून सरोवराचे लोखंडी गेट चक्क कापण्यात आले. गेट तोडून आत प्रवेश करीत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सरोवराच्या गेटजवळ फोटो सेशनही करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
त्वरित गेट बंद केले
एमआयएम नगरसेवक आणि कार्यकर्ते निघून गेल्यावर घटनेची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित सरोवराला कुलूप लावण्याचे आदेश दिले. बीओटी विभागाचे उपअभियंता शेख खमर यांना संबंधितांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.
एमआयएमचा निव्वळ स्टंट
एमआयएम पक्षाची वाताहत मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यांचा जनाधार आता संपत आला असून, मागील काही दिवसांपासून नगरसेवक निव्वळ स्टंट करण्यात मग्न आहेत. मनपावर उर्दूत बोर्ड लावणे, सभागृहात गोंधळ घालणे, भांडणे करणे, खुर्च्या भिरकावणे ही वृत्ती चांगली नाही. न्यायालयाचा आदरही हा पक्ष करीत नाही. सरोवराचे कुलूप तोडण्याचा प्रकार आम्हीसुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. चित्रफीत न्यायालयात दाखविण्यात येईल.
- नंदकुमार घोडेले, महापौर
न्यायालयाचा उघडपणे अवमान
मागील चार वर्षांपासून सरोवर बंद आहे. सरोवराजवळ एक उद्यान नागरिकांसाठी खुले आहे. स्वामी विवेकानंद उद्यानही जवळ आहे. सरोवरातील ३०६ झाडे, येथे येणारे १३२ पक्षी टिकावेत म्हणून आम्ही न्यायालयात गेलो. शहरासाठी हे आॅक्सिन हब आहे. येथे पर्यटक नागरिक आल्यास सरोवराची वाट लागेल. मनपाने सरोवराचे रक्षण योग्य केले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी कुलूप तोडले. न्यायालयाचा अवमान झाल्याचे आम्ही निदर्शनास आणून देणार आहोत.
- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र