दहेगाव बंगला येथे जिल्हा परिषद शाळेला कुलूप; शिक्षण सभापतींनी समोर आणला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:30 PM2020-11-24T13:30:02+5:302020-11-24T13:31:12+5:30
जिल्ह्यात सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या सुचनेनुसार शिक्षणाधिकारी ते विषय शिक्षकांच्या पथकांनी ३०० शाळांना भेटी दिल्या.
औरंगाबाद : दहेगाव बंगला (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नियुक्त सातही शिक्षक सोमवारी हजर नसल्याचा प्रकार शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी उघडकीस आणला. सकाळी ९ ते २ वेळेत ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य केली आहे. या शासन आदेशाचे मुख्याध्यापकासह शिक्षकांनी पालन केले नाही. त्यांच्यावर कारवाई करण्ण्याचे निर्देश त्त्यांनी शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांना दिले.
शिक्षण सभापतींनी सोमवारी दुपारी दहेगाव बंगला येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी या शाळेत कुणीच नव्हते. त्यांनी हा प्रकार शिक्षणाधिकारी जयस्वाल यांच्या कानावर घातला. जयस्वाल हे वाळूज येथील शाळेला भेट देत होते. त्यांनी दहेगाव येथे भेट दिली. या शाळेत साफसफाई केलेली नव्हती. तर शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांचे पथक पोहचल्यावरही येथे शाळेचे कोणीच हजर नव्हते. ही शासन आदेशाची पायमल्ली असल्याचे गलांडे यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांना शिस्तभंगाची ताकीद
जिल्हा परिषद हायस्कूल वाळूजला जयस्वाल यांच्या पथकाने भेट दिली. त्यावेळी प्राथमिकचे १० तर माध्यमिकचे १३ शिक्षक हजर होते. ४३४ नववी ते बारावीचे विद्यार्थी पट संख्या असताना केवळ एक विद्यार्थी हजर होता. तीन दिवसांत कामात प्रगती दाखवा अन्यथा शिस्तभंगाची ताकीद मुख्याध्यापकांना देण्यात आली.
३०० शाळांना भेटी
जिल्ह्यात सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या सुचनेनुसार शिक्षणाधिकारी ते विषय शिक्षकांच्या पथकांनी ३०० शाळांना भेटी दिल्या. यात नियमांचे पालन केल्या की नाही यांच्या नोंदी करुन घेतल्या. सोमवारी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी कन्नड, खुलताबाद, किनगाव येथील शाळांना भेटी दिल्या. त्यात दहावीच्या पुरवणी परीक्षा सेंटरचीही पाहणी केली.