पुन्हा लॉकडाऊन : सावरत असलेल्या कारखान्यांना धक्का; उद्योग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:46 PM2020-07-07T16:46:40+5:302020-07-07T16:49:20+5:30
मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या उद्योग क्षेत्राला अनलॉकमुळे दिलासा मिळून उद्योग क्षेत्र गती घेत होते.
औरंगाबाद : शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात १० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने सावरत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या उद्योग क्षेत्राला अनलॉकमुळे दिलासा मिळून उद्योग क्षेत्र गती घेत होते. मात्र, शहर व जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयामुळे उद्योगांचे मोठे नुकसान होणार असल्याची मते उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहेत.
उद्योग क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...
भविष्यात संचारबंदी पाळणार नाही
उद्योग सुरू राहावेत ही आमची जबाबदारी आहे. प्रशासनाची गरज आणि आरोग्य सुविधांवर वाढणाऱ्या भारावर उपाय म्हणून उद्योग १० जुलैपासून बंद स्वीकारू; परंतु भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून संचारबंदी करू नये. प्रशासनासोबत काम करून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक पुढे येतील. आज उद्योजकांनी तात्पुरता बंद स्वीकारला आहे. याचा अर्थ भविष्यात बंद स्वीकारला जाईल, असा होत नाही. सर्व एमआयडीसी क्षेत्र बंद असेल. उद्योगांच्या चुकांमुळे कोरोना पसरला नाही, असे मत उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
अशी परिस्थिती पुढे येऊ नये
शहरातील उद्योजक, लघु उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाने सर्वांना परिस्थिती समजावून सांगितली. संचारबंदीला जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा असेल. अशी परिस्थिती पुढे येऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन काळजी घेईल. अर्थकारणाला खीळ बसू नये, असे मत उद्योजक मानसिंह पवार आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केले.
उत्पादन आणि ग्राहकांची साखळी तुटेल
उद्योग चालू करणे आणि बंद करणे ही एक सायकल आहे. पूर्ण एक आठवड्याची मेहनत लागते. कामगार गावाकडे जातात. उत्पादन आणि ग्राहकांची साखळी तुटते. सिंगल सोर्स सप्लायर, क्रिटिकल आॅर्डर असतात, त्यांचे नियोजन खर्चिक आहे. पूर्ण चर्चेअंती नुकसान सर्व बाजूने होत असल्याचे समोर आले, मग प्राधान्य येथील आरोग्यासाठी देण्याचे ठरले. सोशल सिस्टिम आणि इकॉनॉमिक सिस्टिममधील फायदे आणि तोट्यांचे विश्लेषण मांडले, तर यात औरंगाबादचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे नुकसान होईल, असे समोर आले. किराणा, मेडिकल, भाजी हे बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर बंद होते तेव्हा तेथेच अडचण असते; परंतु उद्योग बंद झाल्यावर परदेशासह देशातील ग्राहकांची साखळी तुटते. त्यांना येथे काय चालले याच्याशी काही संबंध नसतो; परंतु शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेला सहकार्य म्हणून निर्णय घेतला आहे, असे सीआयआयचे झोन अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
लॉकडाऊनची सूचना दोन दिवसांनंतर :
लॉकडाऊनबाबतची अधिसूचना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे संयुक्तपणे काढतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. सोमवारी याबाबत महापालिकेत विचारणा केली असता रात्रीपर्यंत ही अधिसूचना जारी करण्याबाबत काहीच हालचाल झालेली नव्हती. लॉकडाऊनच्या आराखड्याबाबत येत्या दोन दिवसांत सर्वंकष माहितीची अधिसूचना महापालिका जारी करील, अशी माहिती मिळाली.