व्यापाराच्या मुळावर उठला लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:03 AM2021-03-28T04:03:27+5:302021-03-28T04:03:27+5:30
४ तास वगळता वाहतूक बंद राहणार असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसला आहे. शहरात ३० हजार रिक्षा ...
४ तास वगळता वाहतूक बंद राहणार असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसला आहे. शहरात ३० हजार रिक्षा तर ४५ हजार रिक्षाचालक आहेत. बहुसंख्य रिक्षाचालक हे रिक्षा भाड्याने घेऊन चालवितात. त्यांच्यासमोर पुढचे १० दिवस तरी रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. लॉकडाऊन त्यांच्यासाठी सहन करण्यापलिकडचा आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगार अकुशल मजूर यांची संख्या शहरात प्रचंड आहे. कामगार चौक, टीव्ही सेंटर, उस्मानपुरा, शहागंज येथे रोज सकाळी हे मजूर कामाच्या शोधात उभे राहतात. रोजगार मिळाला तर सायंकाळी त्यांची चूल पेटते. पुढचे १० दिवस त्यांच्यासाठी कामच नसणार. त्यांच्या जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
या लॉकडाऊनमधून बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळाला असे दिसते, पण ते वास्तव नाही. बांधकामाच्या जागेवर मजुरांच्या राहण्याची व्यवस्था असेल तर ते बांधकाम चालू राहू शकते, पण बहुसंख्य ठिकाणी विकासकांची अशी व्यवस्था नसते. त्यामुळे वरकरणी हा दिलासा दिसत असला तरी वास्तवात तसे नाही. बहुसंख्य बांधकाम कारागीर, मजुरांचे हात रिकामेच राहणार आहेत.
स्टोव्ह, गॅस, मिक्सर, चेन दुरुस्त करणारे. पंक्चर काढणारे, शिंपी, सराफी दुकानातील कारागीर, ट्रक, दुकानांच्या शटरला ग्रिसिंग करणारे गटाई कामगार, घड्याळ दुरुस्ती, चष्मा दुरुस्ती, डुप्लिकेट चावी तयार करणारे, गॅरेज, सायकल दुरुस्ती असे एक ना अनेक बारिकसारिक उद्योगाचे काय? या सर्वाच्या मुळावर लॉकडाऊन उठला आहे.