Lockdown In Aurangabad : लॉकडाऊनसाठी ८० टक्के पोलीस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:30 PM2020-07-11T20:30:38+5:302020-07-11T20:31:19+5:30
शहरातील जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले
औरंगाबाद : शहरात दुसऱ्यांदा लागू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शहर पोलीस दलातील ८० टक्के पोलीस रस्त्यावर उतरल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. शहरातील जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केल्यामुळे रस्त्यावर केवळ सरकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांची वाहने होती.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आराखडा तयार केला. यानुसार शुक्रवारी पोलीस आयुक्त प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, डॉ. हनुमंत भापकर, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे, रवींद्र साळोखे यांच्यासह १७ पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, ३५० होमगार्ड, राज्य राखीव बलाच्या दोन कंपन्या, १५ स्ट्रायकिंग फोर्स पथक, सहा दंगा काबू पथक (आरसीपी) तैनात आहे. शहरातील ५० ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहेत. १८ जुलैपर्यंत शहरात पोलिसांचा असाच बंदोबस्त असेल, अशी माहिती उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शनिवारी पोलीस अधिक कडक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.
प्रमुख रस्त्यावर चारचाकीतून, तर गल्लीत दुचाकी गस्त
लॉकडाऊनसोबतच संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी आणि चारचाकी वाहनातून गस्त सुरू केली आहे, तर कॉलन्यांमध्ये अंतर्गत गल्लीत दुचाकीवरून पोलीस गस्त घालत आहेत.
पोलिसांच्या मदतीला मनपा कर्मचारी
चौकाचौकांत नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांच्या मदतीला महापालिकेचे कर्मचारी तैनात केले आहेत.
चौकात रस्त्याची एक बाजू बंद
प्रत्येक चौकात पोलिसांनी रस्त्याची एक बाजू बंद केली. यामुळे वाहन तपासणी करणे पोलिसांना सोपे होत होते.