औरंगाबादमध्ये ‘लॉकडाउन’मुळे ५,५०० कोटींची उलाढाल ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:18 AM2020-04-08T05:18:54+5:302020-04-08T05:18:54+5:30
‘कोरोना’चा दणका : उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण
विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘लॉकडाउन’मुळे संपूर्ण देशभरातील उद्योग १४ एप्रिलपर्यंत ठप्प राहणार आहेत. या कालावधीत औरंगाबाद परिसरातील उद्योगांची सुमारे ५ हजार ५०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असून, पुढील किमान सहा महिने तरी या परिस्थितीतून सावरण्यासाठी उद्योगांना संघर्ष करावा लागणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २२ मार्चपासून ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आला आहे. एकट्या औरंगाबाद परिसरातील प्रमुख चारही उद्योगनगरींतील जवळपास ३ हजार ५०० उद्योग बंद आहेत. या उद्योगांवर आधारित लघुउद्योग, वाहतूक, कामगार, कर्मचारी आदी सर्वांचेच कंबरडे मोडले आहे.
यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे उद्योग बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे उद्योगांना वर्षभराच्या नफ्याला मुकावे लागणार आहे. याचे परिणाम पुढील किमान सहा महिने तरी तीव्रपणे जाणवतील. उद्योगाच्या सर्व साखळीवर हा परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्योग, कामगार, सरकार, बँका, ग्राहक यांनी एकत्रितपणे नियोजन करून पुढे जावे लागणार आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे उद्योगांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे. उद्योगात नोकरकपातही अटळ आहे. पुढे काही दिवसांनंतर उद्योग सुरू होतील; परंतु तेव्हा उत्पादनाला मार्केटमध्ये उठाव येईल का, ग्राहकांकडून आॅर्डर्स येतील का, ग्राहकांकडून जुने येणे मिळेल
का, ट्रान्सपोर्ट सुरू होईल का आदी चिंता उद्योजकांना भेडसावणार आहेत.
सध्या कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत जमा करण्यासाठी उद्योजकांची लगबग सुरू आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून कारखान्यात जाण्यासाठी परवानगी घेतली जात आहे. उद्योगांमध्ये दरमहा ५ ते १० तारखेला वेतन अदा केले जाते. बहुतांशी उद्योगांत ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारेच थेट बँकेत वेतन जमा केले जाते, असे ‘सीएमआयए’चे सचिव शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले.
‘वेट अॅण्ड वॉच’
अशी परिस्थिती
-‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, पुढे काय गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, हे आता तरी कोणीच सांगू शकत नाही. सध्या तरी ‘वेट अॅण्ड वॉच’ अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग आणि व्यवसायावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी खचून न जाता पुढे काय करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार, उद्योजक, कर्मचारी, ग्राहक आणि बँका या सर्वांनी एकत्र विचार करून या आर्थिक आपत्तीतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल. जे असे एकत्रित विचार करणार नाहीत, त्या व्यवसायांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.