lockdown In Aurangabad : सावरणारी घडी पुन्हा विस्कटली; लहान व छोट्या व्यावसायिकांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 06:39 PM2020-07-13T18:39:06+5:302020-07-13T18:44:50+5:30
जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातून कसा तरी घरगाडा चालयाचा; पण आता पुन्हा सर्वकाही ठप्प झाले आहे.
औरंगाबाद : लॉकडाऊनचे दोन- अडीच महिने संपले आणि पुन्हा एकदा सर्वांनी नवी सुरुवात केली; पण कोरोनाचा कहर वाढत गेला आणि पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आमच्या व्यवसायाची सावरू पाहणारी घडी पुन्हा विस्कटली, अशी व्यथा छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली.
रिक्षा, गॅरेज, इस्त्रीवाले, मेसचालक, स्टेशनरी, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूर यांचे काम लॉकडाऊनच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू झाले होते. जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातून कसा तरी घरगाडा चालयाचा; पण आता पुन्हा सर्वकाही ठप्प झाले आहे.
हप्ते थकले, उत्पन्न थांबले
रिक्षा सुरू झाली तर थोडेसे हायसे वाटले होते. दिवसाला फार काही ग्राहक होत नव्हते. तरी पण जे काही पैसे दिवसाकाठी मिळायचे त्याने दोन-चार दिवसांच्या भाजीपाल्याचा खर्च तरी नक्कीच भागायचा. रिक्षाचे कर्ज डोक्यावर आहे. हप्ते थकल्याने आता बँकेवाले मागे लागले आहेत. व्याज वाढत आहे. घरभाडेही देता येत नाही. मग आता करावे काय, असा प्रश्न पडला आहे.
- पवन दाभाडे, रिक्षाचालक
आठ दिवसांपेक्षा जास्त नको
अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे आधीच व्यवसायाचे खूप नुकसान झाले आहे. अनेकांना दुकानाचे भाडे भरणे कठीण झाल्याने त्यांनी सलूनचे सगळे सामान घरातच आणून ठेवले आहे. कुटुंबाचा खर्च भागविणे दिवसेंदिवस जड जात असताना पुन्हा लॉकडाऊन लागले आणि सगळे शांत झाले. आता मात्र आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस लॉकडाऊन नको.
- सुशील बोर्डे, सलून व्यावसायिक
व्यवसायाला उभारी मिळणार कशी ?
लॉकडाऊनदरम्यान तर लॉण्ड्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. अनलॉक काळात व्यवसायाला थोडीफार उभारी मिळेल, अशी आशा होती; पण तेव्हा १० टक्केही व्यवसाय झाला नाही. काळानुसार बदल केला आणि होम डिलिव्हरीची सेवा सुरू केली. तरी नेहमीच्या ग्राहकांकडूनही व्यवसाय येत नाही. वारंवार लॉकडाऊनचे चक्र चालू राहिले तर व्यवसायाला उभारी मिळणार तरी कशी.
- रोहित लिंगायत, इस्त्री व्यावसायिक