लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष, खासदार जलीलसह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:02 AM2021-04-01T04:02:06+5:302021-04-01T04:02:06+5:30

औरंगाबाद : लॉकडाऊन लागू होण्यास दोन तास उरले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाने लॉकडाऊन रद्द केला. एमआयएमने मोर्चा काढण्याचा ...

Lockdown cancellation scandal, crime against activists including MP Jalil | लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष, खासदार जलीलसह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष, खासदार जलीलसह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

औरंगाबाद : लॉकडाऊन लागू होण्यास दोन तास उरले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाने लॉकडाऊन रद्द केला. एमआयएमने मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यामुळेच घाबरलेल्या प्रशासनाने लॉकडाऊन रद्द केला, असा दावा करीत खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर घेऊन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री जल्लोष केला. संचारबंदीचे उल्लंघन करून आणि विना मास्क, सोशल डिस्टन्सिंग पायदळी तुडविण्यात आले. खासदारांच्या या बेजबाबदार कृतीची गंभीर दखल घेत सिटीचौक पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

खा. इम्तियाज जलील, माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, विकास ऐडके, अज्जू नाईकवाडी, आरेफ हुसेन, अब्दुल समीर अब्दुल साजीद, शारेक नक्षबंदी, इमरान सालार, इसाक पठाण, अखिल सागर, मोहम्मद शोएब आणि अन्य २५ ते ३० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहर आणि ग्रामीणमधील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. प्रस्तावित लॉकडाऊनला विरोध करीत खा. जलील यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. शिवाय विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष, संघटनांनी लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अवघे दोन तास उरले असताना शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर एमआयएमचे शेकडो कार्यकर्ते खा. जलील यांच्या हडको एन १२ येथील घरासमोर जमा झाले. घोषणाबाजी करीत खासदारांपुढे प्रशासन झुकले आणि लॉकडाऊन रद्द झाल्याबद्दल जल्लोष करण्यास सुरुवात केली. विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी खासदारांना खांद्यावर उचलून घेतले. सुमारे दीड तास विना परवानगी आणि संचारबंदीचे उल्लंघन करून हा जल्लोष सुरू होता. ही माहिती मिळाल्यावर फौजदार विजय पवार आणि अन्य कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष थांबवून निघून जाण्यास सांगितले. काही कार्यकर्ते गेले, तर अनेक जण खासदारांसोबत उशिरापर्यंत तेथेच उभे होते. याप्रकरणी फौजदार पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवून खासदारांसह त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Lockdown cancellation scandal, crime against activists including MP Jalil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.