लॉकडाऊनमध्ये चोरीची बाईक विकण्यासाठी बाहेर पडला अन पोलिसांच्या हाती लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 06:29 PM2021-04-29T18:29:03+5:302021-04-29T18:42:27+5:30
Bike theft arrested दारूच्या व्यसनासाठी अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरणारा अटकेत
औरंगाबाद: अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार अजय भाऊसाहेब गात (२१, रा. इंदीरानगर, बायजीपुरा)याला जिंसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
या कारवाई विषयी प्राप्त माहिती अशी की, जिंसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय जाधव, कर्मचारी अयुब पठाण, संपत राठोड, बी पी डोंबाळे, संजय गावडे, नंदलाल चव्हाण आणि शेख बासित हे गस्तीवर असताना कुख्यात आरोपी अजय गात याच्याकडे चोरीची मोटारसायकल असल्याची माहिती त्यांना मिळाली. इंदीरानगर बायजीपुरा भागात तो पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. मात्र, अवघ्या काही फुटावर पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या मोटारसायकलविषयी चौकशी केली . तेव्हा त्याने २० एप्रिल रोजी रात्री व्यंकटेशनगर येथील गणपती रुग्णालयासमोरुन ही दुचाकी दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चोरल्याची कबुली त्याने दिली. यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्यांने जवाहरनगर, एम आय डी सी वाळूज आणि अन्य एका ठिकाणाहून तीन दुचाकी चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या मोटारसायकल त्यांनी विविध ठिकाणच्या वाहनतळावर उभ्या करून ठेवल्या होत्या. या १ लाख ६० हजाराच्या चार मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या.
दोन महिन्यापूर्वी कारफोडून लॅपटॉप चोरला होता
आरोपी अजय गात हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. एका जणावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. शिवाय दिड ते दोन महिन्यापूर्वी अपेक्स रुग्णालय रोडवर अनेक वाहनांच्या काचा त्याने फोडल्या होत्या. एका कारमधून लॅपटॉप चोरला होता. या गुंह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. लॉक अप मधून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरवात केली.
मोटारसायकल विकण्याच्या तयारीत होता
आरोपी गात चोरलेल्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत होता. मात्र लॉकडाउनमुळे त्याला खरेदीदार मिळत नव्हते. दारूच्या व्यसनासाठी तो हे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.