लॉकडाऊनचा फटका ! महापालिकेची मालमत्ता कर वसुली फक्त ११ टक्के; तिजोरीत केवळ ५३ कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 02:22 PM2020-12-28T14:22:19+5:302020-12-28T14:24:50+5:30
Aurangabad Minicipality Property Tax : लॉकडाऊनचा फटका महापालिकेला चांगलाच बसला आहे. अनलॉकनंतरही परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही, हे विशेष.
औरंगाबाद : महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणाऱ्या मालमत्ता कर वसुलीचा आलेख प्रचंड खालावला आहे. मागील नऊ महिन्यांत फक्त अकरा टक्के वसुली झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका महापालिकेला चांगलाच बसला आहे. अनलॉकनंतरही परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही, हे विशेष. वसुलीच नसल्यामुळे प्रशासनाने यंदा अर्थसंकल्पात समाविष्ट केलेल्या विकासकामांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेची खालावलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अलीकडेच मालमत्ता वसुलीचा भार उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे सोपविला. मागील आर्थिक वर्षात तब्बल ११० कोटी रुपये एवढी विक्रमी वसुली झाली. त्यानंतर २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी थकबाकीसह मालमत्ताकराचे उद्दिष्ट तब्बल ४६८ कोटी रुपये निश्चित केले. परंतु, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरात कोरोना संसर्गाची साथ सुरू झाली. त्यामुळे जूनपर्यंत कर वसुली जवळपास बंदच होती. त्यानंतर हळूहळू वसुलीला सुरुवात झाली असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. १ एप्रिलपासून डिसेंबरअखेरपर्यंत नऊ महिन्यांत केवळ ५३ कोटी रुपये इतकाच मालमत्ता कर वसूल झाला आहे. हे प्रमाण अवघे ११.३७ टक्के इतके आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ६३ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. आता चालू आर्थिक वर्षाचे तीन महिनेच शिल्लक राहिले आहेत. आता संपूर्ण उद्दिष्ट गाठायचे झाल्यास राहिलेल्या तीन महिन्यांत ४०५ कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत. नागरिक आणि व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यंदा वसुली शंभर कोटीपर्यंत जाईल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
नऊ महिन्यांत मालमत्ता कर वसुली :
झोन अधिकारी- उद्दिष्ट- वसुली- टक्केवारी
१. नंदकिशोर भोंबे-४८ कोटी-३ कोटी ८५ लाख-०८ टक्के
२. प्रकाश आठवले-४९ कोटी-३ कोटी ७६ लाख- ७.५ टक्के
३. मुकुंद कुलकर्णी-३१ कोटी-१ कोटी ७७ लाख-५.५ टक्के
४. विक्रम दराडे-३९ कोटी-३ कोटी ५१ लाख ८. ८ टक्के
५. सविता सोनवणे- ५५ कोटी- ७ कोटी ५३ लाख१३. ०५ टक्के
६. मीरा चव्हाण-४२ कोटी-४ कोटी १० लाख-९.६९ टक्के
७. महावीर पाटणी-६४ कोटी-९ कोटी ३ लाख-१४ टक्के
८. संतोष टेंगळे-७३ कोटी- ८ कोटी १ लाख- १०.८६ टक्के
९. एस.आर.जरारे-६२ कोटी- ६ कोटी १९ लाख- ९.९१ टक्के
मुख्यालय -०००- ५ कोटी ५१ लाख - ००
एकूण- ४६८ कोटी-५३ कोटी ३१ लाख-११.३७ टक्के