लॉकडाऊन शंभरी : जिल्हा सावरतोय; उद्योगाच्या अर्थचक्राने घेतली १०० टक्के भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:28 PM2020-07-02T20:28:05+5:302020-07-02T20:28:42+5:30

उद्योगांचे सुरू झालेले अर्थचक्र सुरक्षेसह सुरू ठेवण्यात जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पोलिसांनीदेखील पुढाकार घेतला आहे.

Lockdown Hundred Days : The district is recovering; The economic cycle of the industry has taken a 100 percent leap | लॉकडाऊन शंभरी : जिल्हा सावरतोय; उद्योगाच्या अर्थचक्राने घेतली १०० टक्के भरारी

लॉकडाऊन शंभरी : जिल्हा सावरतोय; उद्योगाच्या अर्थचक्राने घेतली १०० टक्के भरारी

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापार उदीम, उद्योग, सेवा क्षेत्रात वाढणारी चहलपहल उत्साहवर्धक 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे सुरुवातीचा महिना उद्योगांना बंद पाळावा लागला; परंतु शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत हळूहळू सर्व उद्योगांची चाके पुन्हा फिरण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या १०० दिवसांचा धांडोळा घेताना उद्योगांनी १०० टक्के भरारी घेऊन पुनश्च हरिओम केल्याने सुमारे पावणेदोन लाख कामगारांच्या रोजीरोटीला चालना मिळाली आहे. 

४ ते १२ जुलैदरम्यान वाळूजसह सात गावांत कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असली तरी त्यातून उद्योगांना वगळण्यात आले आहे. उद्योगांचे सुरू झालेले अर्थचक्र सुरक्षेसह सुरू ठेवण्यात जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पोलिसांनीदेखील पुढाकार घेतला आहे, तर औद्योगिक संघटनांनीदेखील व्यवस्थापन आणि कामगारांसाठी कार्यशाळा घेऊन कोरोनापासून बचाव करून काम कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले, जवळपास १०० टक्के उद्योग सुरू झाल्यासारखेच आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २७ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत या लॉकडाऊनच्या काळात कमीत कमी मनुष्यबळात ५४० अत्यावश्यक उद्योग सुरू होते. २० एप्रिलनंतर आॅनलाईन परवानगी देण्यास सुरुवात झाली. २६ जूनपर्यंत ५,५८३ उद्योजकांना परवानगी देण्यात आली. शहरातून कंपनी मालक आणि कामगारांना (कंटेन्मेंट झोन वगळता) ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५ हजार ५८३ कंपन्यांपैकी ७२९ कंपन्यांनी बससेवेची परवानगी मागितली. ४ हजार ६४८ कंपन्यांना बससेवेची गरज नाही. त्या कंपनीच्या कामगारांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मनुसार परवानगी दिली. उद्योग संघटना आणि प्रशासनाने मिळून २१ हजार ११२ वाहन पास अदा केले. मनपा आयुक्तांनी २७ मेपासून शहरातील चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन हद्दीतील ५५९ कंपन्या सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली.

टप्प्याटप्प्याने दिल्या पासेस
३० एप्रिल रोजी ४ कंपन्यांसाठी ७५ पासेस दिल्या होत्या. १ मे रोजी ८९ कंपन्यांना १,३८५, २ मे रोजी १४३ कंपन्यांना ५ हजार ४७५, ३ मे रोजी २४५ कंपन्यांना ५ हजार ९२४ तर ४ मे रोजी १६५ कंपन्यांना ४ हजार ८०१ कामगारांसाठी पासेस देण्यात आलेल्या आहेत. १७ हजार ६६० पासेसवरून २१ हजार ११२ पास एमआयडीसीने दिले. २६ जूनपर्यंत जवळपास सर्वच कंपन्यांचे अर्थचक्र सुरू झाल्याचे प्रादेशिक अधिकारी जोशी यांनी सांगितले.
6,77,000 : जण लॉकडाऊनमध्ये बाहेरगावावरून जिल्ह्यात आले.

ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी 
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी मृत्यूदर कमी आहे. औद्योगिक परिसरासह वाळूजमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण शोधकार्य वेगाने होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपडेट झाली. तसेच शहरात घाटी सुपरस्पेशालिटीला आर्थिक बळ मिळाले.

काही चांगलेही घडले
1. प्रदूषण कमी झाले.
2. काटकसरीने जगण्याचा धडा मिळाला. 
3. कुटुंबासाठी वेळ देता आला.
4. निसर्ग संपवून नव्हे, तर निसर्गासोबत चालायला हवे, ही शिकवण मिळाली.
5.आरोग्य, व्यायाम, पोषक अन्न याचे महत्त्व लक्षात आले. 


महागाई वाढली का? 
भाजीपाला :लॉकडाऊनच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात भाजीपाला स्वस्त झाला होता. कारण आवक जास्त व मागणी कमी.  मात्र, जून महिना सुरू झाला आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली आणि भाज्या महागल्या. या काळात सर्वच भाजीपाला दुपटीने कडाडला. 
किराणा : लॉकडाऊनमध्ये किराणा व्यवसाय सुरू होता. मात्र, टंचाईच्या भीतीने मार्चअखेरचा आठवडा व एप्रिलच्या पहिला पंधरवड्यात लोकांनी दोन ते तीन महिन्यांचा किराणा भरून ठेवला. त्या काळात राज्य वाहतुकीला बंदी होती. यामुळे किराणा सामान महागले होते. मात्र, एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात मालवाहतूक सुरळीत सुरू झाली आणि भाव कमी झाले. 

औरंगाबाद जिल्ह्याचा मृत्यूदर
4.66(31 मे) लॉकडाऊनमधील
4.75 ( 30 जून) अनलॉक १ मधील 
इतर आजार : कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांत साठ ते सत्तर टक्के घट झाल्याचे घाटी रुग्णालयाच्या आकडेवारीवरून समोर आले. आत्महत्येचा प्रयत्न, सर्पदंश, अपघाताचे रुग्ण घटले. फॉलोअप रुग्णांसाठी फिजिशियन, डॉक्टर, तज्ज्ञ व्हिडिओ कॉल, टेलिमेडिसिनचाही वापर करीत आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया झाल्या.

काय सुरू?
जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांना परवानगी दिली. एमआयडीसीसह बाहेरील उद्योगही सुरू झाले. जिल्ह्यात सर्व मिळून १ लाख ७० हजार ९६३ कामगार सध्या  कंपनीत जात आहेत. उद्योग सुरू झाल्यामुळे रोजगार आणि अर्थकारणाला चालना मिळाली, असे एमआयडीसीचे अधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर महिनाभरात उद्योग पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली. उद्योग येथील बॅकबोन आहेत. ९ जूनपर्यंत उद्योगांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होता. १०० पैकी ७० दिवस उद्योग सुरू आहेत. ३० दिवस कडकडीत संचारबंदीत गेले. नंतर मात्र जिल्ह्यातील उद्योग व रोजगार संख्या पूर्वपदावर आली.     -उदय चौधरी, जिल्हाधिकारी 

काय बंद?
२६ जूनच्या शासन आदेशानुसार सलून, स्पा, ब्युटीपार्लर सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. सिनेमागृह आणि मॉल्स, हॉटेल्स, मल्टी मार्केटस् ३१ जुलैपर्यंत बंद असणार आहेत. शहरात सम, विषम याच पद्धतीने ३१ जुलैपर्यंत बाजारपेठा खुल्या राहतील. ग्रामीण भागात सध्या जो नियम आहे, तोच राहणार आहे. 

सलूनच्या दुकानाचे नुकतेच नूतनीकरण केले आहे. त्यासाठी बँकेचे कर्ज काढले. मात्र लॉकडाऊनमुळे हप्ते देणेसुद्धा शक्य झाले नाही. अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने आता सलूनचालकांना अनुदान दिले पाहिजे. त्याशिवाय आर्थिक अडचणी संपणार नाहीत.     -किरण बिडवे, सलून व्यावसायिक, बेगमपुरा 

200कोटी व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
औरंगाबादेत सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले. हॉटेल, मॉल, नाट्यगृह, सिनेमागृह, प्रवासी वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत बाजारपेठ सुरळीत होणार नाही. 
-लक्ष्मीनारायण राठी,  महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ 


लॉकडाऊनचा पहिला टप्पा सर्वांना नवीन होता. यातून सर्वांना खूप शिकायला मिळाले. प्रशासनासह जनतेला हे नवीन होते. १५ दिवसांनंतर सर्व सुरळीत होईल, असे वाटत होते; परंतु पुन्हा १५ दिवस वाढले. मग समस्या समोर आल्या. स्थलांतरित, धान्य, बेरोजगारीचे मुद्दे समोर येऊ लागले. मजूर, कामगारांचे प्रश्न मग समोर आले. कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत गेला. जूनअखेरपर्यंत २० हजार रुग्ण होण्याचे भाकीत होते; परंतु सुदैवाने तिथपर्यंत गेलो नाही. 
-उदय चौधरी, जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

लॉकडाऊनआधी सुरू असलेले उद्योग । रोजगार
6,000। 2,00,000

लॉकडाऊननंतर सुरू असलेले उद्योग । रोजगार
5583। 1,70,000

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले बेरोजगार : 30,000
 

Web Title: Lockdown Hundred Days : The district is recovering; The economic cycle of the industry has taken a 100 percent leap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.