लॉकडाऊन पर्यावरणाला पोषक; हवेच्या गुणवत्तेने गाठला औरंगाबादेत ‘ग्रीन’ झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:28 PM2020-05-06T17:28:13+5:302020-05-06T17:46:48+5:30
लॉकडाऊनमुळे जवळपास महिनाभर शहरातील विविध उद्योग ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद आहेत. वाहनांसह घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे.
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने औरंगाबादची वर्णी रेड झोनमध्ये लागली आहे. पण लॉकडाऊनचा हा काळ शहराच्या पर्यावरणात्मक आरोग्याच्या दृष्टीने पोषक ठरत आहे. त्यामुळेच एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवेची गुणवत्ता याबाबतीत औरंगाबाद मागील काही दिवसांपासून सातत्याने ग्रीन झोनमध्ये आहे.
लॉकडाऊनमुळे जवळपास महिनाभर शहरातील विविध उद्योग ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद आहेत. वाहनांसह घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे अगदी तुरळक वाहने रस्त्यांवरून धावताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून उद्योगधंदे सुरू झाले असले तरी त्यांचे उत्पादन अजूनही पूर्वीच्या तुलनेत कमीच आहे. या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यावर आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यावर झाला आहे.
याशिवाय लॉकडाऊनमुळे शहरातील बांधकामे, विकासकामेही ठप्प आहेत. बांधकामांमुळे हवेत अतिसूक्ष्म धुळीचे कण पसरतात आणि त्यामुळेही हवेची गुणवत्ता खराब होते. उन्हाळ्यात कोरडी हवा असल्याने हवेतील सूक्ष्म धुलिकण तर अधिकच त्रासदायक ठरतात. यंदा मात्र औरंगाबाद या सगळ्या बांधकामांपासून मुक्त असल्याने हवेत धुलिकणांचे प्रमाण खूपच कमी आहे. सध्या हवेत अतिसूक्ष्म धुलिकण नसल्याने आणि हवा शुद्ध असल्याने रात्रीच्या वेळी आकाशही निरभ्र दिसत आहे. असे मत काही तज्ज्ञांनी मांडले.
नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सद्वारे दाखविण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार मागील एक ते दीड महिन्यापासून औरंगाबादच्या हवेची गुणवत्ता सातत्याने चांगली आणि समाधानकारक या सदरात होत आहे. सोमवार, दि. ४ मे रोजी शहरातील हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ५१ एवढे होते आणि ती समाधानकारक या सदरात मोडणारी होती. याशिवाय मागील काही दिवसांपासून दिवसभरात अतिसूक्ष्म धुलिकणांची (पी.एम. २.५) कमाल मर्यादा ओलांडली गेलेली नाही. बऱ्याचदा हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ९० ते ९५ या दरम्यानही वाढलेले दिसते. दि.२० एप्रिल ते ४ मे असा आढावा घेतल्यास दि. २०, २२ व २९ एप्रिल रोजी हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ४९ एवढे होते. ते चांगले या सदरात मोडणारे आहे. दि. २१ व २३ एप्रिल रोजी हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन ५१ आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये ते ५० एवढे होते.
हवा प्रदूषणाच्या पातळीची गुणवत्ता