लॉकडाऊनमध्ये जन्मदरात ५० टक्क्यांहून अधिक घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:02 AM2021-03-25T04:02:02+5:302021-03-25T04:02:02+5:30
औरंगाबाद : कोरोना आजार एक वर्षाचा झाला. मागील वर्षभरात कोरोनाचे सर्वच क्षेत्रात परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील ...
औरंगाबाद : कोरोना आजार एक वर्षाचा झाला. मागील वर्षभरात कोरोनाचे सर्वच क्षेत्रात परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे शहरी भागातील जन्मदर घटला. ग्रामीण भागातील जन्मदरातही किंचित घट नोंदविली गेली आहे.
२२ मार्चपासून मागील वर्षी शहर आणि ग्रामीण भागात लॉकडाऊन लावण्यात आला होता. यापूर्वी नागरिकांनी अशा पद्धतीचा अनुभव कधीही घेतलेला नव्हता. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे आयुष्यच बदलले आहे. रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिक आजही पोटाची खळगी भागविण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील जन्मदरात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.
शहरी भागात जन्मदरात मोठी घट
२०१८ मध्ये शहरी भागात ४३ हजार ३०५ बालकांनी जन्म घेतला. २०२० मध्ये हा आकडा अवघ्या १५ हजार ४३२ पर्यंत खाली आला. ५० टक्क्यांपेक्षाही अधिक घट जन्मदरात पाहायला मिळत आहे.
नेमकी कारणे काय आहेत याचा शोध घ्यावा लागेल
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मागील वर्षभरात जन्मदरात मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे जन्मदरात घट होण्याचा संबंध नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. मागील वर्षभरात नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. या समस्या कोणत्या आहेत याचा अभ्यास करावा लागेल. त्वरित निष्कर्षापर्यंत पोहोचणे संयुक्तिक ठरणार नाही.
डॉ. बाळकृष्ण राठोडकर, प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.
शहरी ग्रामीण भागातील जन्मदर आकडे
वर्ष - शहर - जिल्हा
२०१८ - ४३,३०५ - ७१,२५८
२०१९ - २१,८३१ - ७१,३१२
२०२० - १५,४३२ - ६४,६९५