वाळूज उद्योगनगरीत शुकशुकाट; संचारबंदीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:58 PM2020-07-04T15:58:00+5:302020-07-04T16:19:37+5:30
या परिसरात केवळ औषधी दुकाने आणि उद्योग सुरु ठेवण्यात आली आहेत.
औरंगाबाद : वाळूज उद्योगनगरीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, साजापूर, साऊथ सिटी याठिकाणी शनिवारपासून १२ जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीतून केवळ दवाखाने-औषधी दुकाने आणि उद्योगांना सूट देण्यात आली आहे. प्रशासनाने उद्योजकांना कमीत कमी मनुष्यबळाच्या मदतीने कारखान्यातील कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी दुपारी संपूर्ण परिसरात पाहणी केली असून संचारबंदिस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याची माहिती दिली आहे.
बजाजनगर या कामगार वसाहतीत कोरोनाचा उद्रेक झाला असून, अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पंढरपूर, सिडको वाळूज महानगर, वाळूज याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ४ ते १२ जुलैदरम्यान वाळूज महानगर परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारपासून वाळूज उद्योगनगरीतील बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, साजापूर, साऊथ सिटी याठिकाणी संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याकाळात भाजीपाला मार्केट, किराणा आदी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
औषधी दुकाने व कारखाने सुरूच राहणार
संचारबंदीतून दवाखाने- औषधी दुकाने आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना वगळण्यात आले आहे. सर्व प्रकाराचे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा, सण व उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उद्योग सुरू ठेवणाऱ्या कंपनीतील कामगार, अधिकारी व उद्योजकांना कंपनीत ये-जा करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून पास वितरित करण्यात आले आहेत.
२७५ पथकांच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु
अनेक ठिकाणाहून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने संचारबंदी लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती. वाळूज औद्योगिक नगरीत संचारबंदी लागू करण्यात आली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी निर्धार केला आहे. आरोग्य विभागाच्या २७५ टीम घरोघरी सर्वेक्षण करून बाधितांचा शोध घेत आहेत.
- उदय चौधरी, जिल्हाधिकारी