निवासस्थानांना कुलूप ठोकून अनधिकृत रहिवाशांनी काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:48 PM2017-11-29T22:48:31+5:302017-11-29T22:48:40+5:30
घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाईसाठी महिनाभरानंतर पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. निवासस्थान वाटप समितीने बुधवारी निवासस्थानांची पाहणी केली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाईसाठी महिनाभरानंतर पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. निवासस्थान वाटप समितीने बुधवारी निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी अनेक निवासस्थानांना कुलूप आढळले. त्यामुळे समितीच्या पाहणीची चाहूल लागल्याने निवासस्थानांना कुलूप ठोकून अनधिकृत रहिवाशांनी पळ काढला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील गैरप्रकार ‘लोकमत’ने १० मार्च रोजी ‘शासकीय क्वॉर्टर्सवर अनधिकृत ताबा’ हे वृत्त प्रकाशित करून समोर आणला; परंतु निवासस्थानांत अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईला मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसत आहे. अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईसाठी समितीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिनाभरात कारवाईसाठी कोणतीच हालचाल झाली नाही. अखेर समितीने पुन्हा एकदा कारवाईची तयारी केली आहे. समितीचे अध्यक्ष उपअधिष्ठाता तथा शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अनिल धुळे, डॉ. जे.बी. भाकरे, प्रशासकीय अधिकारी एस.एस. जाधव आदींनी बुधवारी जवळपास वर्ग-१ ते ४ च्या कर्मचारी, डॉक्टरांच्या जवळपास ९० निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी अनेक निवासस्थानांना कुलूप लावलेले आढळले. त्यामुळे अनेकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवासस्थानांना लवकरच नोटीस लावण्यात येऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.
नोटीस देणार
निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत होणाºया पाहणीत कुलूप आढळले तरीही कारवाई के ली जाईल. घरातील साहित्य जप्त करून पंचनाम केला जाईल, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.