जिल्ह्यातील ५ हजार अंगणवाड्यांना कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:35 AM2017-09-13T00:35:37+5:302017-09-13T00:35:37+5:30
अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मानधनाऐवजी वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मानधनाऐवजी वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
राज्यात अंगणवाडीसेविकांना ५ हजार रुपये व मदतनिसांना केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळते. त्याच तुलनेत देशातील केरळ, तेलंगणा, दिल्ली व अन्य छोट्या राज्यांतील अंगणवाडीसेविकांना दुप्पट मानधन मिळते. शासनाने या बाबीचा विचार करत २०१६ रोजी मानधनवाढ समिती गठीत केली होती. त्या समितीने ९ मार्च २०१७ रोजी अहवालही सादर केला आहे. या अहवालावर महिला व बालविकास मंत्री, वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करुन मानधनवाढीचे आश्वासनही दिले होते. मात्र प्रत्यक्षात मानधनवाढ झाली नाही. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून संपावर गेले आहेत. जिल्ह्यातीलही अंगणवाडी कर्मचाºयांनी या संपात सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील ५ हजार अंगणवाड्या आजघडीला बंद आहेत. तसेच पाच हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघाच्या मंगला सराफ, राजू लोखंडे, जिल्हाध्यक्षा शततारका काटकाडे, अश्विनी महल्ले, वंदना पवार, सत्वशिला पंडित, महानंदा पांचाळ आदींनी केले़