लॉकअपचा वापर होतोय गुन्ह्यांच्या फायली अन् मुद्देमाल ठेवण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:38 PM2018-04-28T18:38:40+5:302018-04-28T18:43:28+5:30
लॉकअपचा वापर आरोपींना ठेवण्यासाठी करण्याऐवजी ठाणेदारांनी तेथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि मुद्देमाल ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.
औरंगाबाद : गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी शहरातील निम्म्या ठाण्यांत लॉकअपच नाही. एवढेच नव्हे तर नऊपैकी चार ठाण्यांच्या लॉकअपचा वापर आरोपींना ठेवण्यासाठी करण्याऐवजी ठाणेदारांनी तेथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि मुद्देमाल ठेवल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.
औरंगाबाद शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सरासरी रोज तीन वाहने चोरीला जातात. मोबाईल चोऱ्या, लुटमार, बलात्कार, विनयभंग आणि खुनासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे आयुक्तालच्या हद्दीत घडत असतात. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाकडून पोलीस कोठडी ठोठावली जाते. पोलीस कोठडीत आरोपींना मूलभूत सुविधा पुरविणे ठाणेप्रमुखांना बंधनकारक आहे. आरोपीने पळून जाऊ नये, तसेच पोलीस कोठडीदरम्यान त्याने आत्महत्येचा प्रयत्न करू नये, याबाबतची सर्व खबरदारी तपास अधिकाऱ्यांना घ्यावी लागते. जोपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो, तोपर्यंत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते.
यामुळे अटकेतील आरोपींना ठेवण्यासाठी प्रत्येक ठाण्यात लॉकअप कक्ष बंधनकारक आहे. असे असताना पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या १७ ठाण्यांपैकी सिटीचौक, क्रांतीचौक, सिडको, एमआयडीसी सिडको, मुकुंदवाडी, जिन्सी, एमआयडीसी वाळूज आणि छावणी या ठाण्यांमध्येच लॉकअप कक्ष आहेत. यापैकी मुकुंदवाडी आणि जिन्सी ठाण्यातील लॉकअपचा वापर केला जात नसल्याचे समोर आले. मुकुंदवाडी ठाण्यातील पुरुषांच्या लॉकअपमध्ये गोपनीय शाखेचे काम केले जाते. तेथे दोन पोलीस कर्मचारी बसतात आणि दैनंदिन कार्यालयीन काम करतात, तर महिला लॉकअपमध्ये पोलीस निरीक्षकांच्या लेखनिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
क्रांतीचौक आणि सिटीचौक ठाण्यावर सर्वाधिक भार
शहरातील सर्वांत जुने पोलीस ठाणे म्हणून सिटीचौक ठाण्याची ओळख आहे. निजामकालीन इमारतीत सुरू असलेल्या सिटीचौक ठाण्याच्या वरच्या मजल्यावर स्त्री आणि पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र लॉकअप आहे. तसेच क्रांतीचौक ठाण्यातही स्त्री आणि पुरुष आरोपींसाठी स्वतंत्र लॉकअप आहे. या दोन्ही ठाण्यांतील लॉकअपवर सर्वाधिक भार आहे. गुन्हे शाखा, वेदांतनगर, बेगमपुरा, उस्मानपुरा, सातारा आदी ठाण्यांतील आरोपींना याच लॉकअपमध्ये डांबण्यात येते, तर सिडको ठाण्याच्या लॉकअपमध्ये सिडकोसह जवाहरनगर, हर्सूल ठाण्यातील आरोपींना ठेवले जाते, तर एमआयडीसी सिडको ठाण्याच्या लॉकअपमध्ये मुकुंदवाडी, पुंडलिकनगर ठाण्यातील आरोपींना ठेवले जाते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
सीसीटीव्हीच्या निगराणीखाली लॉकअप
सिटीचौक, सिडको, क्रांतीचौक आणि एमआयडीसी वाळूज आदी पोलीस ठाण्यांतील लॉकअपमधील आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच ज्या ठाण्यांचा आरोपी लॉकअपमध्ये आहे, त्या ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी लॉकअप गार्ड म्हणून तेथे कर्तव्यावर असतो. एवढेच नव्हे तर आरोपींना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लॉकअपबाहेर एक पाण्याचा माठ अथवा पिंप ठेवलेला असतो.
शहरातील लॉकअप असलेले ठाणे :
सिटीचौक , क्रांतीचौक, सिडको, एमआयडीसी सिडको, एमआयडीसी वाळूज, वाळूज, मुकुंदवाडी, जिन्सी आणि छावणी पोलीस ठाणे.
लॉकअप नसलेले ठाणे :
जवाहरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा, सातारा, हर्सूल, दौलताबाद, वेदांतनगर आणि पुंडलिकनगर ठाणे.
शहरातील पोलीस ठाण्याचा आढावा :
२०१६ मध्ये पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराचे ९० गुन्हे नोंदविले गेले, तर २०१७ साली ७२ घटनांची नोंद झाली. महिलांसंबंधी गुन्ह्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.
- एमआयडीसी सिडको ठाण्याचे लॉकअप सर्वांत मोठे आणि सुरक्षित म्हणून ओळखले जाते. या लॉकअपमध्ये पुरुष आरोपींना ठेवण्यात येते. स्त्री आरोपींच्या लॉकअप कक्षात कर्मचारी बसलेले दिसले.
- सिडको ठाण्यात पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र लॉकअप असून, त्याचा नियमित वापर केला जातो.
- एमआयडीसी वाळूज ठाण्यात महिलांना लॉकअपमध्ये न ठेवता त्यांना क्रांतीचौक ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले जाते.
- शहरात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग आदी गुन्ह्यांची सरासरी संख्या जवळपास ९०० आहे.
- गतवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल ६२९ चोऱ्या झाल्या होत्या, तर यावर्षी ३ महिन्यांत चोरीचे १९० गुन्हे घडले.
- सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या जानेवारी ते मार्च २०१७ मध्ये २६ घटना घडल्या, तर यावर्र्षी १५ गुन्ह्यांची नोंद झाली.
- शहरात २०१६ साली खुनाच्या ४०, तर २०१७ मध्ये ३२ घटना घडल्या.
- खुनाच्या प्रयत्नाचे सन २०१६ मध्ये ९३, तर २०१७ मध्ये ९१ गुन्हे दाखल झाले होते.