मराठवाड्यात टोळधाड दाखल; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 06:27 PM2020-05-30T18:27:47+5:302020-05-30T18:34:47+5:30
खानदेशच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यात टोळधाड दाखल झाल्याचे शनिवारी उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोयगाव : कोविड-१९ च्या संसर्गानंतर शेतकऱ्यांवर नवीन संकट ओढवले असून मध्यप्रदेशात थैमान घातल्याने टोळधाड मराठवाड्यात दाखल झाली आहे. खानदेशच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यात टोळधाड दाखल झाल्याचे शनिवारी उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असतांना शेतकऱ्यांची पेरणी आधीच चिंता वाढली आहे.
सोयगाव तालुक्याचा भाग चारही बाजूंनी डोंगराने वेढला असून मध्यप्रदेशातून या डोंगराळ भागात शुक्रवारी रात्रीपासून अचानक टोळधाड दाखल झाले आहे.खरिपाच्या पेरण्या आधीच सोयगाव तालुक्यात उन्हाळी पेरण्यांची धांदल सुरु झालेली असून त्यातच ऐन पेरण्यांच्या काळात काही भागात टोळधाड दाखल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी सोयगाव तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपले आहे. त्याआधीच काही भागात उन्हाळी पेरण्याची धांदल उडालेली असतांना अचानक टोळधाडच्या आगमनाने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. टोळधाडच्या प्रमाणात अचानक वाढ झालेली असून गावातही टोळधाडचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे सायंकाळपासूनच घरांचे दरवाजे बंद करावी लागतात.
भाजीपाला क्षेत्रावर आक्रमण
तालुक्यात अनेक भागात शेततळ्यांचे पाणी असल्याने ठिबक सिंचनवर भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. यावर आक्रमण करून टोळधाडने संपूर्ण क्षेत्र नष्ट केले आहे. तसेच खरिपाच्या उजाड शेतातही टोळधाडने अड्डा बनविला आहे. त्यामुळे या भागात पेरण्या करण्याची स्थिती बिकट झाली आहे.
कृषी विभागाकडून जनजागृती
याबाबत उपाययोजनांच्या सूचना कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार खरिप हंगामाच्या पेरण्याआधीच टोळधाड बाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार यांनी सांगितले.