लोहगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळेना, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:04 AM2021-03-28T04:04:37+5:302021-03-28T04:04:37+5:30
फुलंब्री : तालुक्यातील लोहगड नांद्रा येथील ऐतिहासिक मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून काही एक फायदा झाला नाही. या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा ...
फुलंब्री : तालुक्यातील लोहगड नांद्रा येथील ऐतिहासिक मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून काही एक फायदा झाला नाही. या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी शासन दरबारी धूळखात पडली आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
फुलंब्री तालुक्यातील लोहगड नांद्रा येथे ऐतिहासिक वारसा लाभलेले रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथे रामायण काळातील आख्यायिका सांगितल्या जातात. दगडाच्या कोरीव कामातून या मंदिराची बांधणी झालेली आहे. प्रवेशद्वारापासून पाच ठिकाणी हौद, मंदिराचा गाभारा, न्हाणी या महत्त्वाच्या वास्तू गडावर तयार झालेल्या आहेत. मंदिरापासून गडावर चढण्यासाठी दगडाच्या पायऱ्या आहेत. या मंदिर परिसरात आणखी काही कोरीव कामे केल्याचे दिसून येते. सीतामाता आपल्या लव व कुश या दोन मुलांसमवेत काही काळ वास्तव्यास होत्या, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे पंचक्रोशीतून हजारो भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला येथे जत्रा भरते. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठा उत्सव साजरा केला जातो.
ऐतिहासिक वारसा जपणारी वास्तू
लोहगड नांद्रा येथील रामेश्वर मंदिराला २००८ मध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर काहीअंशी मदत मिळून विकासकामे करण्यात आली; पण त्यानंतर आवश्यक असणारी कामे होताना दिसत नाहीत. त्या ऐतिहासिक पायऱ्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. वयोवृद्धांना गडावर जाण्यासाठी अडचणी येतात. त्यांच्याकरिता वेगळा मार्ग तयार करणे गरजेचे आहे. अनेक सुशोभीकरणाची कामे रखडली आहेत.
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा
लोहगड नांद्रा येथील मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. मात्र, त्याचा काही एक फायदा झालेला नाही. त्या प्रमाणात निधीदेखील मिळाला नाही. येथील कोरीव कामे व नैसर्गिक वातावरण पाहता, या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आहे. लोहगडाच्या माथ्याशी मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन आहे. विकासकामातून अनेक व्ह्यू पॉइंट येथे निर्माण होऊ शकतात. यासाठी आम्ही शासनदरबारी पाठपुरावा करीत आहोत. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
- बाबूराव तरटे, मंदिर समितीचे अध्यक्ष.
फोटो : लोहगड नांद्रा येथील गडावर कोरीव कामातून निर्माण केलेलं महादेव मंदिर.