Lok Sabha Election 2019 : प्रचारात सोबत उतरण्यासाठी भाजपला प्रतीक्षा सेनेच्या ‘अक्षतां’ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 04:12 PM2019-03-26T16:12:38+5:302019-03-26T16:17:21+5:30
सेनेने जि.प.तील काँग्रेसची साथ सोडली तरच प्रचार करण्याची भूमिका
औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजपची महायुती होऊन २४ रोजी प्रचाराचा नारळ फुटला असला, तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने अजून भाजपला प्रचारात सोबत उतरण्यासाठी ‘अक्षता’च पाठविलेल्या नाहीत.
आधी जि.प.मध्ये सुरू असलेला काँग्रेससोबतचा संसार शिवसेनेने मोडावा, त्यानंतरच पूर्ण ताकदीने प्रचारात उतरू, असा इशारा भाजपने दिला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींबाबत २७ मार्च रोजी शिवसेना-भाजप समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. समन्वयकांच्या बैठकीत जि.प.च्या सत्ता समीकरणावर काही आश्वासक निर्णय झाला नाही तर शिवसेनेने प्रचारासाठी वºहाडी म्हणून दिलेल्या ‘अक्षता’ स्वीकारायच्या की नाही, हे भाजपची नेते मंडळी ठरविणार आहेत.
प्रदेश उपाध्यक्षांचे मत असे
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, शिवसेनेच्या प्रचारात अजून भाजप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. २७ मार्च रोजी भाजप आणि शिवसेना समन्वयकांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत भाजप शिवसेनेसमोर जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याची अट ठेवणार आहे. कॉंग्रेससोबत युती तोडून भाजपसोबत सेनेने युती करावी, अशी आमची अट असणार आहे. त्यावर शिवसेना काय भूमिका घेईल, ते पाहू. त्यानंतर शिवसेनेसोबत प्रचारात उतरण्याचा निर्णय घेऊ.
अर्धा भाजप विदर्भ आणि मराठवाड्यात
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कूच केले आहे. यामध्ये उद्योग आघाडीचे हेमंत खेडकर व इतर बीडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले आहेत. तसेच मंगळवारपासून भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर काही नगरसेवकांसह नागपूरमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. मतदान होईपर्यंत हे पदाधिकारी तिकडेच असणार आहेत. अजून बरेच पदाधिकारी लातूर, जालना मतदारसंघात प्रचारासाठी गेले आहेत.
शिवसेनेतही गटातटाची लढाई
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इतर जिल्ह्यांत प्रस्थान केल्यामुळे शिवसेना उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत अंतर्गत गटातटाची लढाई सुरू आहे, त्यातच शहरातील भाजपने अजून साथसंगत करण्यास सुरुवात केलेली नाही.हा सगळा प्रकार रक्तदाब वाढविणारा आहे. त्यामुळे सेनेतील काही पदाधिकारी अजून प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. जे सक्रिय झाले आहेत, त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. काही पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरीची भाषा सुरू असून, हाणामारीपर्यंत प्रकरण जात आहे.