Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदार शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 08:15 PM2019-03-28T20:15:01+5:302019-03-28T20:17:15+5:30
जिल्ह्यात ६५ हजार ५१९ दिव्यांग मतदारांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार येते.
औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदार शोधण्याचे आणि त्यांना मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. २० हजार मतदारांची संख्या सध्या असल्याचे प्रशासनाचा दावा आहे.
जिल्ह्यात ६५ हजार ५१९ दिव्यांग मतदारांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार येते. १४ वर्षांपर्यंतचे सुमारे ३३ हजार ६८० दिव्यांग वगळून हा आकडा समोर आलेला आहे. यातील मृत मतदारांचा आकडा वगळला तरी उर्वरित मतदार रेकॉर्डवर कसे आणणार असा मुद्दा आहे. यातील औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार रेकॉर्डवर आणावे लागणार आहेत. २० ते २९ वयादरम्यान १७ हजार १८, ३० ते ३९ दरम्यान १४,२४४, ४० ते ४९ वयादरम्यान १० हजार ९७६, ५० ते ५९ दरम्यान ७ हजार ६१९, ६० ते ६९ वयादरम्यान ७ हजार ७६५ मतदारांची जनगणना करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी या प्रकरणात बैठक घेतली. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्राबाहेर आवश्यक साह्य एनएसएस आणि भारत स्काऊट गाईडचे विद्यार्थी करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर सहाय्य करण्याबाबतचे नियोजन शिक्षण, एनएसएस आणि स्काऊट गाईडच्या संबंधित विभागाने करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगांना मतदानाच्या दिवशी द्यावयाच्या नियोजित सुविधांबाबत आयोजित बैठकीत चौधरी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक सतीश देशपांडे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटन आयुक्त शीतल शिंदे, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण आदींची उपस्थिती होती.
एनएसएस, स्काऊट गाईडची मदत
लोकसभा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा स्वयंसेविका विशेष काळजी घेणार आहेत. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), स्काऊट गाईडचे विद्यार्थी साह्य करणार आहेत. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.