Lok Sabha Election 2019 : औरंगाबादमधील २६४ मतदान केंद्रे थेट पाहिली निवडणूक आयोगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:46 AM2019-04-24T11:46:10+5:302019-04-24T11:57:48+5:30
वेबकास्टिंगद्वारे झाले प्रक्षेपण
औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघ क्रमांक १९ साठी निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने २०२१ पैकी २६४ मतदान केंद्रे वेबकास्ट केली. त्या केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोगाने पाहिले. जी मतदान केंद्रे संवेदनशील ऐवजी किचकट आणि उपद्रवी म्हणून संबोधण्यात आली होती त्यासाठी सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले होते. त्या केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे स्ट्रिमिंग करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या दिल्ली मुख्यालयात सदरील २६४ मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला. मतदान केंद्रावर सुरू असलेली प्रक्रिया कॅमेऱ्याच्या माध्यमातून सहायक निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, सीईओ मुंबई व भारत निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयातून पाहिली गेली. २०२१ पैकी २६४ म्हणजेच १० टक्के मतदान केंद्रे वेबकास्ट केली गेली. कोणत्या केंद्रावर ही यंत्रणा राबविली गेली, याबाबत निवडणूक विभागाने खुलासा केला नाही. वेबकास्ट केलेल्या केंद्रांवरील हालचाली निवडणूक आयोगाणे थेट प्रक्षेपणातून पाहिल्या. लाईव्ह कास्टिंग फक्त आयोगाने नेमलेल्या अधिकृत यंत्रणेसाठीच होते.