Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:57 PM2019-03-26T12:57:08+5:302019-03-26T13:04:04+5:30
एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.
औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा घेतला. हैदराबाद येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडणुकीत उमेदवार म्हणून आ. इम्तियाज जलील यांचे नाव निश्चित करण्यात आले. पक्ष मुंबईत एकही जागा लढविणार नसून औरंगाबादमध्ये आपणच उमेदवार असल्याची माहिती आ. जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांचे नाव सर्वात अगोदर जाहीर झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. एमआयएमने ही निवडणूक लढविल्यास मुस्लिम, दलित मतांचे विभाजन होईल, याचा थेट फायदा युतीला होईल, असाही सूर होता. औरंगाबाद आणि मुंबई येथील लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच जाहीर केले. कारण वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव त्यांनी जाहीर केले होते. या नावाला एमआयएमने विरोध दर्शविला.
औरंगाबाद, मुंबई येथे लोकसभा निवडणूक लढवावी किंवा नाही याचा अंतिम निर्णय एमआयएमचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील पक्षाच्या ‘दार-उस्स-सलाम’या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत औरंगाबादहून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले. बहुतांश नगरसेवकांनी लोकसभा निवडणूक लढवावी, उमेदवार म्हणून इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचे पुन्हा नमूद केले. मात्र, यावेळी अंतिम निर्णय झाला नाही. रात्री ८ वा. बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री ८ वा. बैठकीला सुरुवात झाली. तब्बल तीन तास बैठक सुरू होती. रात्री ११ वा. अंतिम निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वत: इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’ला दिली.
कार्यकर्त्यांचा आग्रह
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांचा होता. यासंदर्भात स्थानिक पातळीवर दोन वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या. लोकसभेसाठी आ. इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचा निर्वाळाही कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांसमोर दिला होता.