Lok Sabha Election 2019 : वचन देण्यापुरताच खैरेंचा वचननामा मर्यादित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 02:20 PM2019-04-03T14:20:50+5:302019-04-03T14:40:14+5:30
खैरे विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत.
औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा, रिपाइं (आ), रासप गटाचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे हे मैदानात आहेत. १९९९ पासून ते मतदारसंघातून संसदेत जात असून, जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी प्रचारात सेवा, सुरक्षा, विकासाचा मुद्दा घेऊन ते मतदारांना सामोरे जात आहेत. समाजसेवा हेच ध्येच असल्याचे ते सांगतात. आजवर शहरातील बहुतांश विकासकामांचा दाखला देऊन आगामी काळात संधी मिळाल्यास शहरात विकासकामे करणार असल्याचे सध्या सांगत असले तरी मागील निवडणुकीत त्यांनी जो जाहीरनामा सादर केला होता, त्यातील किती कामे पूर्ण झाली, याचा लेखाजोखा.
समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना आणि सिमेंट रस्ते करणार असल्याचे त्यांनी मागच्या निवडणुकीत जाहीर केले होते. समांतर जलवाहिनी काही पूर्ण झाली नाही. भूमिगत गटार योजना गटांगळ्या खात आहे, तर शहरातील सिमेंट रस्त्यांवरून अजूनही ओरड सुरू आहे. शहरात पाणीपुरवठाही तीन दिवसाआड होतो आहे, पर्यटननगरी खड्ड्यांत गेली आहे. औरंगाबाद जरी ऐतिहासिक व पर्यटनाचे शहर असले तरी त्याचे मार्केटिंग चांगले झालेले नाही. रस्ते पाहिल्यावर पर्यटक एकदा आले, तर नंतर पुन्हा येणार नाहीत, अशी अवस्था आहे. पुरातत्व विभागाची बांधकाम स्थगिती उठविणे, समांतरसाठी केंद्राचा निधी मिळविणे, भूमिगत गटार योजनेसाठी केंद्राचा निधी मिळविण्यासारखी कामे खा. खैरे यांना आघाडी सरकारच्या काळात करता आली.
२०१४ पासून आजपर्यंत केंद्र शासनाकडून खासदार म्हणून त्यांना उल्लेखनीय असे कोणतेही काम करता आलेले नाही. विमानसेवा, रेल्वेवाहतूक, औरंगाबद रिंगरोड, बीड बायपास, जालना रोडसाठी केंद्र शासनाकडून निधी आणण्याबाबत त्यांना काहीही करता आलेले नाही. संसदेतील अधिवेशनात हजेरी लावणे आणि प्रश्न उपस्थित करण्यापलीकडे शहर व जिल्हा म्हणून केंद्र शासनाकडून विशेष असे योगदान मागील पाच वर्षांत मिळविता आले नाही.
असा होता वचननामा सद्य:स्थितीत काय आहे
१. समांतर जलवाहिनी योजनेतून २४ तास पाणी देणार योजना सुरूच झाली नाही
२. टुरिझम हब म्हणून सर्वांगीण विकास करणार आश्वासन कागदावरच राहिले
३. खाम नदी व नहर-ए-अंबरीचे पुनरुज्जीवन करणार काहीही केले नाही
४. हिमायतबागेचा कृषी उद्यान विकास करणार काहीही केले नाही
५. औद्योगिक वसाहतीत एकात्मिक वाहतूक प्रणाली आणणार घोषणेपुरते राहिला मुद्दा
६. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार प्रश्न सुटलेला नाही
७. दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीचे आश्वासन यावर फक्त आंदोलने केली
८. औद्योगिक वसाहतींसाठी विशेष योजना राबविणार कुठलीही योजना राबविली नाही
९. शहरातील गुंठेवारीची समस्या सोडविणार गुंठेवारीतील प्रश्न जैसे थे
१०. नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार फारसे प्रयत्न केले नाहीत
११. शहराबाहेर हायवे चौपदरी करण्याचे आश्वासन कुठलेही प्रयत्न झाले नाहीत
१२. जिल्ह्यात वारकरी भवन उभारणार मुद्दा कागदावरच राहिला
जिल्ह्यात विकासकामे केली
खा. चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. दुष्काळामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत तर केलीच. शिवाय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. शहरातील रस्ते विकासासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच निधी मिळाला. -प्रशांत डिघुळे
दलित वस्तीत एकही काम नाही
शहर व जिल्हा भरात दलित वस्तीत कोणतेही विकासकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला खासदाराचे काम काय असते, याविषयी कोणतेही आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. जनतेच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे. -सुनील घाटे
ऐतिहासिक शहराचा कचरा केला
ऐतिहासिक तसेच औद्योगिक क्षेत्रासह शहराच्या पर्यटनाचा खा. चंद्रकांत खैरे यांनी कचराच केला असून, कामगार बेरोजगार झाले तरीदेखील केंद्रात एकदाही कामगार कायद्यावर ठराव मांडला नाही. २० वर्षांत नेत्रदिपक कामगिरीची कोणताही इतिहास सांगणे शक्य नाही.
- अॅड. उद्धव भवलकर
वाड्या, तांड्यांवर कामे झाली
निवडणूक जाहीरनाम्यात कार्यकर्त्यांना व स्थानिक नागरिकांना दिलेल्या आश्वासनात रस्ते, तसेच सामाजिक सभागृहाचे काम खा. चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. वस्ती, वाड्या, तांड्यांवर ते सतत धावून येतात. - राजेंद्र राठोड