Lok Sabha Election 2019 : ओल्या बाळंतिणीने बजावला मतदानाचा हक्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 03:01 PM2019-04-24T15:01:20+5:302019-04-24T15:06:28+5:30

रोहिणी निकम यांनी राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याचा व्यक्त केला आनंद

Lok Sabha Election 2019: A Mother has casting her vote at Aurangabad | Lok Sabha Election 2019 : ओल्या बाळंतिणीने बजावला मतदानाचा हक्क!

Lok Sabha Election 2019 : ओल्या बाळंतिणीने बजावला मतदानाचा हक्क!

googlenewsNext

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देणे हे प्रत्येक मतदाराचे आद्य कर्तव्य असते. एखादा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येक मत हे खूप मोलाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या औरंगाबाद मतदारसंघासाठीचे मतदान आज पार पडले. शहराच्या रामनगर भागातील रहिवासी निकम दाम्पत्याने सुजाण नागरिक असल्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. योगेश निकम यांच्या पत्नी रोहिणी निकम यांनी एक दिवसाच्या बाळाला घेऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी देशाप्रती असलेले आपले कर्तव्य निभावल्याचा आनंद व्यक्त केला. 

रामनगर येथील रहिवासी योगेश निकम हे ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’मध्ये कार्यरत असून, त्यांच्या पत्नी रोहिणी निकम (२९) या गृहिणी आहेत. दोन मुली असलेल्या रोहिणी यांनी त्यांच्या तिसऱ्या अपत्याला २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी जन्म दिला. चेतनानगर येथील चौबे हॉस्पिटलमध्ये त्या अ‍ॅडमिट होत्या. प्रसूती वेळेत झाली तर आपण मतदान नक्की करू, असा त्यांनी निश्चय केला होता. प्रसूती झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाण्यापूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. रामनगर येथील श्रीराम प्राथमिक शाळा येथे सकाळी ११:३० या वेळेत जाऊन त्यांनी मतदान के ले. यावेळी त्या म्हणाल्या,‘ मी आज खूप खुश आहे. प्रसूतीनंतरही माझा हक्क बजावता आला यातच मोठा आनंद सामावलेला आहे. देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडीसाठी असलेले माझे कर्तव्य मी पार पाडले आहे.’

जागरूक मतदाराचे कर्तव्य निभावले
‘देशाचा विकास होण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सिंहाचा वाटा असतो. योग्य आणि कार्यतप्तर उमेदवाराची निवड करणे हे मतदाराचे प्रथम कर्तव्य असते. आज मी देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडले याचा मला प्रचंड आनंद आहे. मी माझ्या एक दिवसाच्या बाळाला घेऊन मतदानासाठी आले आहे. याचे त्याच्यावरही चांगलेच संस्कार होणार आहेत. तो भावी मतदार असून त्यालाही भविष्यात माझ्याप्रमाणेच प्रत्येक अडचणीवर मात करून देशासाठी आपले कर्तव्य बजावायचे आहे.’

Web Title: Lok Sabha Election 2019: A Mother has casting her vote at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.