Lok Sabha Election 2019 : परभणी सात, तर हिंगोलीत आठ उमेदवारी अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 06:27 PM2019-03-28T18:27:50+5:302019-03-28T18:40:26+5:30
२९ मार्च उमेदवारी परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे़
औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात ६ उमेदवारांचे ७, लातूर आणि उस्मानाबादमध्ये तीन उमेदवारांचे ५, तर हिंगोलीत ८ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. २९ मार्च उमेदवारी परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे़
परभणीत एकाची माघार
परभणी लोकसभा मतदारसंघात २७ जणांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ६ उमेदवारांचे ७ अर्ज नामंजूर करण्यात आले. उर्वरित २१ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने पहिल्याच दिवशी अर्ज परत घेतला होता़ त्यामुळे आता २० उमेदवार रिंगणात आहेत़
लातुरात तिघांचे ५ अर्ज अवैध
लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात २७ अर्जांपैकी ५ अर्ज विविध प्रकारच्या त्रुटींमुळे बाद ठरविण्यात आले. १२ जणांचे २२ अर्ज वैध ठरले आहेत. भाजपकडून संजय दोरवे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. वंचित आघाडीच्या विकास कांबळे यांचाही अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला
हिंगोलीत ८ उमेदवार बाहेर
हिंगोली लोकसभा मतदार संघात ३४ जणांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले, तर ८ जणांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहे.
उस्मानाबादेत पाच अर्ज अवैध
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ३८ अर्जांपैकी मनोहर पाटील, लिंबाजी राठोड, विष्णु देडे या अपक्ष उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरले आहेत़
बीडमध्ये ५३ उमेदवार रिंगणात
बीड लोकसभा मतदार संघात छाननी प्रक्रियेनंतर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांचे ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननी बुधवारी झाली. यात ८ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.