Lok Sabha Election 2019 : उन्हाचा वाढता पारा उमेदवारांसाठी ‘ताप’दायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 08:42 PM2019-03-30T20:42:54+5:302019-03-30T20:52:18+5:30

सकाळी व सायंकाळी प्रचार करण्याचे केले जातेय नियोजन

Lok Sabha Election 2019: politicians are facing trouble in campaigning dut to increased summer heat | Lok Sabha Election 2019 : उन्हाचा वाढता पारा उमेदवारांसाठी ‘ताप’दायक

Lok Sabha Election 2019 : उन्हाचा वाढता पारा उमेदवारांसाठी ‘ताप’दायक

googlenewsNext
ठळक मुद्दे मार्च महिन्यातच पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. दुपारी सोशल मिडिया अन् सांयकाळी बैठका

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत मार्च महिन्यातच पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. हाच वाढता पारा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी ‘ताप’दायक बनला आहे. कारण भर उन्हात प्रचार कसा करावा, कार्यकर्ते प्रचाराला येतील का, असे अनेक प्रश्न उमेदवारांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत. पुढील महिन्यात आणखी पारा वाढेल हे लक्षात घेऊन सकाळी व सायंकाळी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी व दुपारच्या वेळी सोशल मीडियावर प्रचार, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे असे नियोजन केले जात आहे. 

औरंगाबाद लोकसभा निवडणूक पंचरंगी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे. जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी मतदान आहे. यामुळे आता प्रचारासाठी कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज भरल्यानंतर उमेदवार प्रचाराला सुरुवात करणार आहेत. एप्रिल महिना म्हणजे भर उन्हाळ्यात उमेदवारांना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायचा आहे. मार्चअखेरीस पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पारा किती वर जाईल हे सांगता येणे कठीण आहे. पंचरंगी निवडणुकीमुळे सर्व उमेदवार चिंतित आहेत. त्यात वाढता पारा यामुळे अधिक भर पडली आहे. प्रत्येक उमेदवाराकडील प्रचार विभाग प्रचाराची रणनीती आखत आहे.

यासंदर्भात एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रचारासाठी आम्ही सकाळी व सायंकाळी प्रचार करणार आहोत. सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान व सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान प्रचारफेरी, सभा, बैठका घेण्यात येणार आहेत. तर दुपारच्या वेळी कार्यकर्त्यांच्या बैठका, तसेच सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्यात येणार आहे. एका उमेदवाराच्या प्रचार विभागाच्या प्रमुखाने सांगितले की, अजून प्रचारफेरी सुरू झाली नाही. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराला गती येईल. कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे व आपल्या पक्षाच्या कार्याची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, वाढत्या उन्हामुळे कार्यकर्ते दुपारी कसा प्रचार करतील, हीसुद्धा चिंता उमेदवारांना सतावत आहे. 

एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, शहरात लग्न सोहळे सुरू आहेत. वरातीसाठी खास चलमंडप तयार करण्यात आले आहेत. अशाच मंडपाचा वापर प्रचार फेरीत करण्याचा विचार केला जात आहे. येत्या काळात प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जाणार आहेत. हे प्रत्यक्षात रणधुमाळीतच लक्षात येईल. 

सोशल मीडियासाठी स्वतंत्र सेल
जनसंपर्कासाठी सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम बनले आहे. या माध्यमाचा संपूर्ण फायदा निवडणूक काळात घेण्यासाठी उमेदवार सरसावले आहेत. यामुळे प्रत्येक उमेदवाराने  सोशल मीडियासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. याद्वारे जाहीरनाम्यापासून ते विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणे, टीका-टिपणी करण्यापर्यंत सर्व काम सोशल मीडियावर केले जाणार आहे. निवडणूक आयोगाची सोशल मीडियावर करडी नजर राहणार आहे. यामुळे कायद्याच्या सर्व बाजू तपासूनच सोशल मीडियावर प्रचार केला जाणार असल्याचे एका उमेदवाराच्या सोशल मीडिया विभागातील कार्यकर्त्याने सांगितले. 

Web Title: Lok Sabha Election 2019: politicians are facing trouble in campaigning dut to increased summer heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.