Lok Sabha Election 2019 : प्रचार साहित्य विक्रेत्यांची मदार आता अपक्ष उमेदवारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 02:29 PM2019-03-31T14:29:01+5:302019-03-31T14:30:49+5:30

निवडणूक रिंगणात जेवढे जास्त अपक्ष तेवढा व्यवसाय अधिक

Lok Sabha Election 2019: Promotional Vendors Market depends on Independent candidates | Lok Sabha Election 2019 : प्रचार साहित्य विक्रेत्यांची मदार आता अपक्ष उमेदवारांवर

Lok Sabha Election 2019 : प्रचार साहित्य विक्रेत्यांची मदार आता अपक्ष उमेदवारांवर

googlenewsNext

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झाली असून, अपक्षांची संख्या कमी राहावी यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्नशील असणार आहेत. मात्र दुसरीकडे अधिकाधिक अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरावेत असे  प्रचार साहित्य विक्रेत्यांना वाटत आहे. जेवढे अपक्ष उमेदवार आखाड्यात असतील तेवढा व्यवसायही अधिक होतो, हे त्यामागचे व्यापारी गणित आहे. 

लोकसभेची १७ वी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीत प्रचार साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, आता आचारसंहिता आणखी कडक झाल्याने प्रचार साहित्य वापरण्यावरही मर्यादा आल्या आहेत. तरीही विविध राजकीय पक्षांचे झेंडे, टोप्या, गमछे, निवडणूक चिन्ह असलेले बिल्ले या प्रचार साहित्यास या काळात मागणी अधिक असते. शहरात सध्याचे निवडणुकीचे चित्र लक्षात घेता तीन प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात उतरतील असे चित्र आहे. याच वेळी दोन प्रमुख अपक्ष उमेदवारांसह इतरही काही अपक्ष उमेदवार मैदानात असतील. सद्य:स्थितीत १०३ उमेदवारी अर्ज विकले गेले आहेत. 

यासंदर्भात प्रचार साहित्य विक्रेते सुमित बोरा यांनी सांगितले की, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी त्यांच्या पक्षाच्या मुख्य कार्यालयातून प्रचार साहित्य येत असते. साहित्य कमी पडले तरच हे उमेदवार आमच्याकडून झेंडे, गमछे, बिल्ले घेऊन जातात किंवा हौशी कार्यकर्ते स्वत:चे पैसे खर्च करून प्रचार साहित्य खरेदी करतात. मात्र, विक्रेत्यांसाठी अपक्ष उमेदवार महत्त्वाचा असतो. कारण त्यांच्या प्रचार साहित्याची ऑर्डर थेट स्थानिक विक्रेत्यांकडे येते. यामुळे निवडणूक रिंगणात जेवढे जास्त अपक्ष उमेदवार तेवढ्या प्रचार साहित्याची अधिक विक्री होते. यामुळे विक्रेत्यांचे सर्व लक्ष किती अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, याकडेच असते. 

विक्रेत्यांनी महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी यांच्यासाठी लागणारे झेंडे, गमछे, टोप्या तयार करून ठेवल्या आहेत. आता उभे राहिलेल्या अपक्षांपैकी किती जण अर्ज मागे घेतात. तसेच जे निवडणूक लढविणार आहेत त्या अपक्ष उमेदवारांना कोणते निवडणूक चिन्ह मिळते. यानंतर त्यांच्या चिन्हाचे प्रचार साहित्य तयार करण्यात येईल. यंदा निवडणुकीच्या काळातच गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती येत आहे. यानिमित्त वेगवेगळ्या रंगातील ध्वजांची मागणी लक्षात घेता निवडणूक प्रचार साहित्यासोबतच जयंतीसाठीचे ध्वजही विक्रीला ठेवले आहेत. बोरा म्हणाले की, पाव मीटर ते ३१ मीटर लांबीचे झेंडे तयार करण्यात आले आहेत. ५ रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंतचे झेंडे विक्रीस आहेत. 

सर्व राजकीय पक्षांची  चिन्हे एकाच ठिकाणी 
राजकीय पक्षांच्या उमेदवारापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जण आपल्या पक्षाच्या चिन्हाचे बिल्ले शर्टला लावत असतात. हे कार्यकर्ते एवढे कट्टर असतात की, विरोधी पक्षाच्या चिन्हाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. पण प्रचार साहित्य विक्रेत्यांकडे ही सर्व चिन्हे एकत्रच ठेवलेली असतात. एकमेकांच्या जवळ  ठेवलेले असतात.

Web Title: Lok Sabha Election 2019: Promotional Vendors Market depends on Independent candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.