Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी २३ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद; ६१.८७ टक्के झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:10 PM2019-04-24T12:10:14+5:302019-04-24T12:12:14+5:30

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन सिपेट या कंपनीत सर्व ईव्हीएम सील करून जमा

Lok Sabha Election 2019: sealed the fate of 23 candidates for the Lok Sabha election of Aurangabad; 61.87 percent polling | Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी २३ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद; ६१.८७ टक्के झाले मतदान

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी २३ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद; ६१.८७ टक्के झाले मतदान

googlenewsNext

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात होते. त्या उमेदवारांच्या भवितव्यासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. २०२१ मतदान केंद्रांवर घेण्यात आलेले मतदान ईव्हीएममध्ये नोंदविले गेले आहे. २,४४५ सीयू, ४,९०३ बीयू आणि २,६२२ व्हीव्हीपॅट सर्व मतदान केंद्रांवर होत्या. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन सिपेट या कंपनीत सर्व ईव्हीएम सील करून जमा करण्यात येणार आहेत. उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये दडले असून, २३ मे रोजी सकाळी ८ वा. मतमोजणीला सुरुवात होईल, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले. 

मतदान प्रकियेनंतर सर्व ईव्हीएम सील होऊन सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षेत येण्यास २४ एप्रिलची पहाट होण्याची शक्यता आहे. २४ तारखेला सकाळी ११ वा. स्ट्राँगरूममध्ये सर्व ईव्हीएमच्या बाबतीतील कागदपत्रांची छाननी होणार आहे. निरीक्षक ब्रजमोहन कुमार यांच्या निगराणीमध्ये छाननी होईल. ईव्हीएम येण्यास उशीर होणार असल्याचे गृहीत धरून ११ वाजेची वेळ निर्धारित करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले. सील केलेल्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये ठेवल्यानंतर सील करण्यात येईल. मतमोजणी केंद्राला प्रचंड पोलीस बंदोबस्त असणार आहे. ईव्हीएम यंत्रे आता पूर्ण एक महिना सील केलेल्या स्वरूपात राहणार आहेत. मतमोजणीची तारीख २३ मे आहे. तोपर्यंत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक कायम राहणार आहे. असे असले तरी मंगळवारी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी झाला, या थाटात फटाक्यांची आतषबाजी केली. 

६१.८७ टक्के झाले मतदान
लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६१.८७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तुरळक अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडल्याचा दावा चौधरी यांनी केला. शहर व ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, ६ वाजेपर्यंत ६१.८७ टक्के मतदान झाल्याचे आयोगाला कळविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत जे मतदान प्रक्रियेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत केंद्रात आलेल्या मतदारांचेच मतदान करून घेण्यात येणार आहे. रात्री उशिरानंतर त्याची आकडेवारी समोर येईल. मॉकपोलमुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिरा सुरू झाली, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ
निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. पूर्व मतदारसंघात एका कर्मचाऱ्याला मॉकपोलदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याच्याठिकाणी दुसरा कर्मचारी नेमला, तर सिल्लोडमधील एका केंद्रावर रवाना झालेल्या कर्मचाऱ्याला फीट आल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

Web Title: Lok Sabha Election 2019: sealed the fate of 23 candidates for the Lok Sabha election of Aurangabad; 61.87 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.