Lok Sabha Election 2019 : ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 07:11 PM2019-04-04T19:11:47+5:302019-04-04T19:13:54+5:30
खैरेंसोबतच्या बैठकीनंतर शांतीगिरी महाराजांनी घेतली माघार
औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर महाराजांनी सायंकाळी ४ वा. पत्रकार परिषदेत ‘ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी’ असे सांगून भक्त परिवाराने नि:स्वार्थी, कर्तृत्ववान उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: व जय बाबाजी परिवाराचा कुणालाही पाठिंबा नाही, निवडणुकीत २ लाखांच्या आसपास मतदान मिळाले असते, त्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
नि:स्वार्थी उमेदवार कोण आहे, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी शांतीगिरी यांच्यावर केला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर योग्य व कर्तृत्ववान उमेदवाराची निवड करून भूमिका जाहीर केली जाईल. ‘लढा राष्ट्रहिताचा व संकल्प शुद्ध राजकारणाचा’ हे ब्रीद घेऊन औरंगाबाद, जालना, शिर्डी-अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे या ७ लोकसभा मतदारसंघांत बाबाजी सांगतील तेच धोरण असेल, असे शांतीगिरी म्हणाले. मतदारांनी नि:स्वार्थी उमेदवाराला मतदान करावे, प्रलोभनाला मतदारांनी बळी पडू नये.
समीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम
शांतीगिरी महाराजांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे राजकीय समीकरणांचा गुंता वाढण्याची चर्चा होती; परंतु त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ साली शांतीगिरी महाराजांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले, तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. शांतीगिरी महाराजांनी निवडणूक मैदानातून माघार घेतल्यामुळे भक्त परिवार स्वेच्छेने मतदान करण्यास मोकळा झाला आहे. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार असून, ती मते निर्णायक आहेत. मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्नेहभोजनासह राजकीय चर्चा केल्या होत्या.