Lok Sabha Election 2019 : शांतीगिरी महाराज वाढविणार समीकरणाचा गुंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 09:03 PM2019-03-30T21:03:24+5:302019-03-30T21:05:53+5:30
औरंगाबादेतून लढण्याबाबत भक्तांनी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे केली तयारी
- विकास राऊत
औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी केल्याची शक्यता आहे. त्यांनी शुक्रवारी निवडणुकीच्या अनुषंगाने दोन उमेदवारी अर्ज घेतले असून, भक्तांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संकेत दिल्यामुळे त्यांनी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणाचा गुंता वाढणार आहे. त्यांनी अर्ज नेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, ते अर्ज दाखल करतील आणि निवडणूक लढवतील, त्यावेळीच खरे चित्र स्पष्ट होईल.
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील आणि शांतीगिरी महाराज यांच्यासह सुभाष पाटील यावेळी निवडणूक मैदानात राहतील, असे दिसते. भाजपासोबत शिवसेनेचे मनोमिलन झाले असले तरी माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवार अर्ज नेला आहे.
सुभाष पाटील यांनी २००९ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणुक लढविली होती. त्यांनी १७ हजार २६ मते घेतली होती. ही मते त्यांना कन्नड आणि शहरातून मिळाली होती. शिवसेनेच्याच उमेदवाराची मते त्यांनी घेतली. तर शांतीगिरी महाराज यांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. यावेळी शांतगिरी महाराजांनी जर निवडणुक मैदानात उतरण्याचे निश्चित केले तर मतदानाच्या गोळाबेरीजचा मोठा गुंता होईल. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार आहे.
जय बाबाजी भक्त परिवाराची २००९ साली शांतीगिरी महाराजांना १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. ही मते निर्णायक ठरली होती. १० वर्षांनंतर शांतीगिरी महाराज मैदानात येण्याच्या तयारीला लागले असून १० वर्षांपूर्वी १४ लाख ८ हजार ७९८ मतदार होते. यावेळी मतदार संघात १८ लाख ५९ हजार मतदार आहेत. साडेचार लाखांनी मतदार वाढले आहेत.
वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी
मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्रेहभोजनही घेतले. महाराजांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. नाशिक, जळगाव, औरंगाबादपैकी कुठेही त्यांना विचार झाला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी भरण्याचा त्यांनी विचार केला आहे. त्यांची उमेदवारी शिवसेना, काँग्रेस उमेदवारांच्या व्होटबँकेला मोठा हादरा देऊ शकते. गेल्या आठवड्यात भक्तांची मते जाणून घेतल्यानंतरच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यांची उमेदवारी राजकीय गुंता वाढवील.