मराठवाड्यातील लढतींचे चित्र; मविआचे सहा उमेदवार जाहीर, महायुतीत तीन जागांचा तिढा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:55 AM2024-03-28T06:55:23+5:302024-03-28T07:40:27+5:30
औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लोकसभेच्या आठपैकी सहा जागांवरील उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडी प्रचाराला लागली असून, महायुतीचे घोडे अजूनही तीन जागांवर अडले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बुधवारी सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबादमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. खैरे यांच्या उमेदवारीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विरोध होता.
हिंगोलीचे विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील शिंदे गटात गेल्याने ठाकरे यांनी तिथे हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना संधी दिली आहे. परभणीत संजय ऊर्फ बंडू जाधव, तर उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर या विद्यमान खासदारांना संधी मिळाली आहे.
चारपैकी तीन मराठा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठवाड्यात दिलेले चारपैकी तीन उमेदवार मराठा समाजाचे तर एक ओबीसी प्रवर्गातील आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीला शिवसेनेचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. मराठा आरक्षण आंदोलन लक्षात घेऊन उमेदवार निवडल्याचे दिसून येते.
मराठवाड्यात मविआचे उमेदवार
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (शिवसेना-उबाठा)
जालना - अद्याप जाहीर नाही (काँग्रेस)
परभणी - संजय जाधव (शिवसेना - उबाठा)
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना, उबाठा)
नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
लातूर - डाॅ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर (शिवसेना, उबाठा)
बीड - अद्याप जाहीर नाही (राष्ट्रवादी श. प.)
जालना-बीडमधून कोण?
मराठवाड्यातील आठ जागांपैकी चार शिवसेनेकडे, तीन काँग्रेस तर एक जागा राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडण्यात आली आहे.
जालन्यातून काँग्रेस तर बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.
जालन्यातून कल्याण काळे (काँग्रेस) तर बीडमधून बजरंग सोनवणे अथवा ज्योती मेटे
यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीत काय?
भाजप - नांदेड, लातूर, बीड, जालना
शिवसेना (शिंदे) - अद्याप एकही उमेदवार जाहीर नाही.
राष्ट्रवादी (अजित पवार) - अद्याप एकही उमेदवार जाहीर नाही.
(औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोलीचा पेच कायम)
महायुतीची तिघाडी
महायुतीत औरंगाबाद, हिंगोली आणी उस्मानाबाद या तीन जागांचा तिढा कायम आहे. औरंगाबादच्या जागेवर भाजप आणि शिंदे गट, उस्मानाबादमध्ये भाजप-राष्ट्रवादी तर हिंगोलीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.