Lokmat APL: शक्ती स्ट्रायकर्सची फायनलमध्ये धडक; सय्यद सर्फराजचे हॅट्ट्रिकसह ४ बळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:07 PM2023-02-06T12:07:41+5:302023-02-06T12:08:33+5:30

नयन चव्हाणची पुन्हा निर्णायक खेळी

Lokmat APL: Shakti Strikers reach finals; 4 wickets with a hat-trick by Syed Sarfraz | Lokmat APL: शक्ती स्ट्रायकर्सची फायनलमध्ये धडक; सय्यद सर्फराजचे हॅट्ट्रिकसह ४ बळी 

Lokmat APL: शक्ती स्ट्रायकर्सची फायनलमध्ये धडक; सय्यद सर्फराजचे हॅट्ट्रिकसह ४ बळी 

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी लोकमतऔरंगाबाद प्रीमिअर क्रिकेट लीगच्या दहाव्या पर्वात सय्यद सर्फराजचे हॅट्ट्रिकसह चार बळी आणि नयन चव्हाण याची बहारदारी खेळी या बळावर एकतर्फी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत शक्ती स्ट्रायकर्सने अंतिम फेरीत धडक मारली.

विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य घेऊन खेळणारा गुड्डू ईएमआय २१ संघ सय्यद सर्फराजच्या भेदक गोलंदाजीसमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १२.२ षटकांत ८९ धावांत कोसळला. शक्ती स्ट्रायकर्सकडून सय्यद सर्फराजने २२ धावांत ४ व कंवरसिंग चौहान याने २५ धावांत ३ गडी बाद केले. आर्यन शेजूळ, प्रीण कुलकर्णी व नयन चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

त्याआधी नयन चव्हाण याच्या आकर्षक अर्धशतकी खेळीच्या बळावर शक्ती स्ट्रायकर्सने १५ षटकांत चार बाद १७७ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून नयन चव्हाणने ४५ चेंडूंत सहा चौकार, पाच षट्कारांसह ८३ धावांची नेत्रदीपक खेळी केली. त्याला साथ देणाऱ्या अनुभवी इंद्रजित उढाणने २६ चेंडूंत तीन चौकार, तीन षट्कारांसह ४६, राहुल जोनवालने सात चेंडूंत दाेन चौकार, एका षट्कारासह १९ व इम्रान पटेलने १० चेंडूंत दाेन चौकार व एका षट्कारासह १७ धावा काढून साथ दिली. गुड्डू ईएमआय २१ संघाकडून युनूस पठाणने ३८ धावांत चार गडी बाद केले.

त्याआधी इंद्रजित उढाण आणि नयन चव्हाण यांनी शक्ती स्ट्रायकर्सला ५२ चेंडूंत ८४ धावांची सलामी दिली. इंद्रजित उढाण याने राजू पारचाके, विकास नगरकर व मुस्तफा शाह यांचा समाचार घेतला. त्याने राजू पारचाकेला षट्कार व चौकार ठोकला, तर मुस्तफा शाह व विकास नगरकर यांना उत्तुंग षट्कार खेचला. दरम्यान, जबरदस्त फार्मात असणाऱ्या नयन चव्हाण याने सुशील अरकला रिव्हर स्विपचा प्रेक्षणीय षट्कार ठोकला. युनूस पठाणच्या गोलंदाजीवर इंद्रजित उढाण बाद झाल्यानंतर नयन चव्हाण याने १४ व्या षटकात राज पारचाके याच्या गोलंदाजीवर मिडविकेट व ऑनसाइडला एकूण दोन सणसणीत षट्कार आणि स्कूपचा प्रेक्षणीय चौकार मारत या षटकात २१ धावा वसूल करून दिल्या. नयनने युनूस पठाणला षट्कार ठोकत या स्पर्धेत संदीप नागरे याची वैयक्तिक ८१ धावांची खेळी मागे टाकली. याच षटकात नयन चव्हाण धर्मेश पटेलच्या हाती सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला.

संक्षिप्त धावफलक
शक्ती स्ट्रायकर्स : १५ षटकांत चार बाद १७७. (नयन चव्हाण ८३, इंद्रजित उढाण ४६, राहुल जोनवाल नाबाद १९, इम्रान पटेल १७, युनूस पठाण ४/३८)
गुड्डू ईएमआय २१ : १२.२ षटकांत सर्वबाद ८९. (योगेश चौधरी २७, धर्मेश पटेल १९. सय्यद सर्फराज ४/२२, कंवरसिंग चौहान ३/२५, आर्यन शेजूळ १/१०, प्रवीण कुलकर्णी १/१६, नयन चव्हाण १/१).

Web Title: Lokmat APL: Shakti Strikers reach finals; 4 wickets with a hat-trick by Syed Sarfraz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.