लोकमत औरंगाबाद प्रीमिअर लीग: गुड्डू ईएमआय २१ संघ सेमीफायनलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:10 PM2023-02-04T12:10:33+5:302023-02-04T12:11:44+5:30
लोकमत औरंगाबाद प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आपल्या पदार्पणातच गुड्डू ईएमआय २१ संघ सेमीफायनमध्ये
औरंगाबाद : गुड्डू ईएमआय २१ संघाने गरवारे स्टेडियमवर सुरू असलेल्या लोकमत औरंगाबाद प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आपल्या पदार्पणातच भवानी टायगर्स संघावर ४ गडी राखून सेमीफायनलमधील आपले तिकीट पक्के केले.
गुड्डू ईएमआय २१ संघाने विजयी लक्ष्य १०.३ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून धर्मेश पटेलने ७ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह २१, स्वप्निल खडसेने १४ चेंडूंत ५ चौकारांसह २२, विकास नगरकरने १० चेंडूंत ३ चौकार, एका षटकारासह १९, योगेश चौधरीने १६ धावा केल्या.
विजयासाठी पाठलाग करताना विकास नगरकर आणि धर्मेश पटेल यांनी सलामीसाठी १३ चेंडूंतच ४९ धावांची भागीदारी केली. विकास नगरकर आणि धर्मेश पटेल यांनी मोहंमद इम्रानच्या पहिल्या षटकांतच २४ धावा ठोकल्या. यात विकासने दाेन चौकार, एक षटकार तर धर्मेश पटेलने एक षटकार ठोकला. त्यानंतर धर्मेशने इम्रान अली खानचाही एक चौकार व एक षटकार तर विकास नगरकरने एक चौकार ठोकला. मात्र, धर्मेश पटेल तिसऱ्या षटकांत अनिकेत काळेच्या थेटफेकीद्वारे धावबाद झाला. सामन्याच्या तिसऱ्या षटकांत व्यंकटेश सोनवलकरने विकास नगरकरला बाद करीत दुसरा धक्का दिला. त्यानंतर योगेश चौधरी (१६), आकाश पाटील, किरण लहाने (९) व आकाश विश्वकर्मा १) हे बाद झाल्याने संघ अडचणीत आला. मात्र, स्वप्निल खडसेने झटपट खेळी करीत गुड्डू ईएमआय संघाचा विजय सुकर केला.
त्याआधी गोलंदाजांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर गुड्डू ईएमआय २१ संघाने भवानी टायगर्स संघाला १५ षटकांत १०४ धावांत रोखले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भवानी टायगर्सचा अर्धा संघ ५.३ षटकांतच तंबूत परतला. त्यानंतर संदीप नागरे आणि मोहंमद वसीम यांनी ३० चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करीत संघाला शंभरी पार करून दिली. भवानी टायगर्सकडून कर्णधार आणि संघ मालक संदीप नागरे याने २५ चेंडूत ३ चौकारांसह २६ आणि मोहंमद वसीम याने १९ चेंडूंत ४ चौकारांसह २९ धावा केल्या. मुस्तफा शाहने ३ षटकांत फक्त १४ धावा देत ३ गडी तर विकास नगरकरने २ गडी बाद केले. राज पारचाके, सुशील अरक व युनूस पठाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
भवानी टायगर्स : १५ षटकांत ९ बाद १०४. (मो. वसीम २९, संदीप नागरे २६, मुस्तफा शाह ३/१४, विकास नगरकर २/२३, राजू पारचाके १/२२, सुशील अरक १/२०, युनूस पठाण १/२०).
गुड्डू ईएमआय २१ : १०.३ षटकांत ६ बाद १०५.
(स्वप्निल खडसे नाबाद २२, धर्मेश पटेल २१, विकास नगरकर १९, योगेश चौधरी १६. यश नाहर २/१८, मो. वसीम १/८, व्यंकटेश सोनवलकर १/२०).