लोकमत इफेक्ट : 'त्या' कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:28 PM2020-05-18T19:28:42+5:302020-05-18T19:31:40+5:30
जटवाडा रोडवरील हर्सूल तलावासमोरील हनुमाननगर येथे राहणाऱ्या रंजना भोसले या विधवेला दोन लहान मुले आणि दोन मुली आहेत.
औरंगाबाद : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून काम बंद पडल्याने उपलब्ध धान्य जास्त दिवस पुरावे म्हणून पाच जणांच्या कुटुंबाने प्रत्येकी एक पोळी खाऊन दिवस काढले, हे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी प्रकाशित करताच या कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह अनेक जण धावून गेले. या मदतीमुळे आता रंजना भोसले यांच्या कुटुंबाची उपासमार थांबेल.
जटवाडा रोडवरील हर्सूल तलावासमोरील हनुमाननगर येथे राहणाऱ्या रंजना भोसले या विधवेला दोन लहान मुले आणि दोन मुली आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्यामुळे ती आणि तिची मुले एक पोळी खाऊन दिवस काढत होते. याविषयी ‘लोकमत’ने शनिवारी ‘एकच पोळी खाऊन दिवस काढत आहे पाच जणांचे कुटुंब’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार किशोर देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच तिच्या घरी धाव घेतली व त्या कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढे किराणा सामान दिले.
पगारिया फाऊंडेशनच्या वतीने वैभव घुले यांनी रंजना भोसले यांना गव्हाचे पीठ, तांदूळ दिला. मानवसेवा ग्रुपचे आनंद अग्रवाल यांनी सकाळी महिलेच्या घरी जाऊन त्यांना रेशन कीट, गहू आणि तांदूळ दिले. यासोबतच रंजना यांच्या घराशेजारील २० गरीब कुटुंबांनाही गहू आणि तांदूळ वाटप केले.
बुलंद छावा संघटनेचे मनोज गायके यांनी रंजना यांच्या चारही मुलांना कपडे, घरखर्चासाठी काही रक्कम दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी पंधरा दिवस पुरेल एवढे रेशन कीट, मुलांना कपडे, बूट आणि एक महिन्याचे घरभाडे दिले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी भोसले कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पंधरा दिवस पोटभर जेवण करता येईल एवढे रेशन कीट आणि किराणा सामान पाठवले. बोधी बहुउद्देशिय संस्थेचे प्रा. प्रशांत दंदे यांनी त्यांना रेशन कीट दिले.
‘लोकमत’मुळे झाली पोटभर जेवणाची सोय
मदतीसाठी आलेल्या अग्रवाल यांनी ‘लोकमत’मध्ये बातमी आल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीकडून बातमी वाचून घेतली. सकाळपासून सायंकाळपर्यंत आठ ते दहा जणांनी मदत आणून दिल्याने मी आणि माझे कुटुंब दोन वेळचे पोटभर जेवण करू शकणार आहे. माझ्या मुलांना कपडेही मिळाले आहेत. मी ‘लोकमत’ची आभारी आहे.
- रंजना भोसले