लोकमत इम्पॅक्ट -शहाजीराजे भोसले स्मारकाची केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 03:30 PM2020-10-10T15:30:35+5:302020-10-10T15:32:02+5:30
वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली.
खुलताबाद : वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची दुरावस्था 'लोकमत'ने गुरूवारी निदर्शनास आणली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या परिसराची स्वच्छता व साफसफाई केली. मात्र शासकीय यंत्रणा अद्यापही या बाबतीत सुस्तच असल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत.
वेरूळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकाची गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता व साफसफाई झाली नव्हती. त्यामुळे स्मारक चहूबाजूंनी गाजर गवतांनी व झाडाझुडूपांनी वेढले गेले होते. अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढे येत शहाजीराजे भोसले स्मारकाची स्वच्छता मोहीम हाती घेतली.
वेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढी होती. तेथे शहाजीराजे भोसले यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र मागील ११ वर्षांपासून स्मारकाचे काम बंद असल्याने शहाजीराजे भोसले स्मारक चोहोबाजूंनी गाजरगवतांनी, झाडाझुडूंपानी वेढले गेले आहे. स्वच्छता नसल्याने पर्यटकही याठिकाणी फिरकत नाहीत.
शासनाच्या दुर्लक्षामुळे शहाजीराजे भोसले स्मारकाचेे काम ११ वर्षांपासून रखडले आहे. स्मारकाच्या झालेल्या कामाचीही आता तोडफोड झाली आहे. समता परिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे सा. बां. च्या अभियंत्यांना सांगितले, परंतु त्यांनी दखलही घेतली नाही, असे म्हणणे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मांडले.