लोकमत इम्पॅक्ट : संपूर्ण ‘स्ट्रिप’ची सक्ती करणाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:46 PM2019-04-30T16:46:53+5:302019-04-30T16:47:46+5:30
पूर्वी सक्ती करणारे आता देत आहेत स्ट्रिप कापून टॅबलेटस्, रुग्ण, नातेवाईकांचा अनुभव
औरंगाबाद : औषधी गोळ्यांची संपूर्ण ‘स्ट्रिप’ रुग्णांच्या माथी मारणाऱ्या औषधी दुकानांना अन्न व औषधी प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत. या कारवाईमुळे ‘स्ट्रिप’ची सक्ती करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. परिणामी पूर्वी सक्ती करणारे ‘स्ट्रिप’ कापून टॅबलेटस् देत असल्याचा अनुभव रुग्ण, नातेवाईक आणि ग्राहकांना येत आहे.
शहरातील औषधी दुकानांवर दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप माथी मारण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आणले. याविषयी २५ एप्रिल रोजी ‘रुग्णांच्या माथी टॅबलेटस्ची संपूर्ण स्ट्रिप’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून पडताळणी केली, तेव्हा सर्वसामान्यांना अनेक औषधी दुकानांवर आर्थिक भुर्दंड सहन करून संपूर्ण स्ट्रिप घ्यावी लागत असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी सहा गोळ्या लिहिलेल्या असताना दहा गोळ्यांची स्ट्रिप घेण्याची सक्ती काही ठिकाणी करण्यात आली. या प्रकाराविषयी सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अशाप्रकारे स्ट्रिपची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रुग्ण, नातेवाईक आणि सर्वसामान्यांकडून करण्यात आली.
औषधी आणि सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मधील ६५(९) या तरतुदीनुसार, रुग्णाला औषधी दुकानातून वितरित करायच्या औषधांबाबत स्पष्टपणे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णाने सहा गोळ्या मागितल्या, तर त्याला दहा गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप देण्याची आवश्यकता नाही. तरीही अनेक औषध दुकानदारांकडून त्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण स्ट्रिपची सक्ती क रण्यात येत असल्याचे समोर आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न औषधी प्रशासनाने स्ट्रिपची सक्ती करणाऱ्यांची तपासणी केली. ‘लोकमत’ने केलेल्या पडताळणीत स्ट्रिपची सक्ती करणाऱ्या औषधी दुकानांना अखेर कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत. सात दिवसांत त्यांच्याकडून उत्तरे प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण स्ट्रिपच्या सक्तीविषयी सर्वसामान्य रुग्ण, नातेवाईक, ग्राहक यांच्यासह विधितज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकार थांबण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक औषधी विक्रेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विक्रेता सक्ती करीत नाही,असे काहींनी म्हटले.
पूर्वी नकार देत, पण आता देतात
उपचारासाठी दर महिन्याला डॉक्टरांकडे जावे लागते. डॉक्टर महिनाभराच्या गोळ्या लिहून देतात. पैशांमुळे पूर्वी अर्ध्या गोळ्या द्या म्हटल्यावर औषधी दुकानदार नकार देत असे. स्ट्रिप कापता येत नाही, असे सांगून टाळत असे. त्यामुळे पूर्ण गोळ्या घ्याव्या लागत होत्या; परंतु दोन दिवसांपूर्वी पुन्हा अर्ध्या गोळ्या द्या म्हटल्यावर तात्काळ गोळ्या दिल्याचे एका महिलेने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. असाच अनुभव अनेकांना येत आहे.
नोटिसा आणि इतरांना सूचना
‘लोकमत’ने पडताळणी केलेल्या दोन औषधी दुकानांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. एकाची अजून चौकशी सुरूआहे. नोटीस काढलेल्यांना सात दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. स्ट्रिपच्या सक्तीसंदर्भात नियमित तपासणी केली जात असते. यापुढेही औषधी दुकानांना यासंदर्भात सूचना केल्या जातील.
- संजय काळे, सहआयुक्त, औषध प्रशासन