लोकमत महामॅरेथॉन: छत्रपती संभाजीनगरकरांनो चला धावू या, स्वत:च्या आरोग्यासाठी, शहरासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 12:49 PM2024-12-11T12:49:39+5:302024-12-11T12:50:17+5:30

छत्रपती संभाजीनगरमधील लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा; नाेंदणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक

Lokmat Mahamarathon: Chhatrapati Sambhajinagarkars let's run...for our health, for our city | लोकमत महामॅरेथॉन: छत्रपती संभाजीनगरकरांनो चला धावू या, स्वत:च्या आरोग्यासाठी, शहरासाठी

लोकमत महामॅरेथॉन: छत्रपती संभाजीनगरकरांनो चला धावू या, स्वत:च्या आरोग्यासाठी, शहरासाठी

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील नागरिक, धावपटूंसाठी उत्सुकता असलेली ‘लोकमत महामॅरेथॉन’ १५ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुलावर होत आहे. महामॅरेथॉनसाठी उदंड प्रतिसाद मिळत असून, आता नोंदणीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. तेव्हा आजच आपली नोंदणी करून आरोग्याच्या या महाउत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

निरोगी आरोग्यासाठी नियमित चालणे व धावणे, हे आवश्यक आहे. मात्र, धकाधकीच्या जीवनामुळे नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे निरोगी आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जाते. महामॅरेथॉनचे यंदाचे हे आठवे पर्व आहे. याआधी झालेल्या सातही पर्वातील महामॅरेथॉनला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. बालगोपाळांपासून ते थोरांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला आहे. यंदाही महामॅरेथॉनच्या आठव्या पर्वात नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हजारो नागरिक आपली नोंदणी करून सहभाग निश्चित करीत आहेत. तसेच महामॅरेथॉनच्या तयारीसाठी सर्व शहरातील मैदानात नागरिक कसून सराव करीत आहेत. आपल्या निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा श्रीगणेशा करणाऱ्यांसाठी ही महामॅरेथॉन जीवनाला कलाटणी देणारी ठरणार आहे.

ही महामॅरेथॉन समाजाला जोडणारी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. त्याचप्रमाणे महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडेही आयोजकांचे काटेकोरपणे लक्ष असते. धावपटूंची ऊर्जा कायम ठेवण्यासाठी दुतर्फा ढोल-ताशांचा निनाद, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात. त्यामुळे सहभागी धावपटूंचा धावताना उत्साह कायम असतो व त्याला धावण्याचा आनंदही घेता येतो. त्यामुळे मराठवाड्यातील ‘नंबर वन महामॅरेथॉन’ अशी ओळख ‘लोकमत महामॅरेथॉन’ची झाली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे लोकमत महामॅरेथॉनला असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त झाला असून, लोकमत महामॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झालेली ही महामॅरेथॉन राज्यातील धावपटूंसाठी एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनो, आता तत्काळ आपला प्रवेश निश्चित करून या महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!

Web Title: Lokmat Mahamarathon: Chhatrapati Sambhajinagarkars let's run...for our health, for our city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.