‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार दुग्धशर्करा योग ठरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:55 AM2019-02-24T00:55:06+5:302019-02-24T00:55:40+5:30

गुणवत्तेला प्रामाणिकपणा, शिस्तीबरोबर संधीची जोड मिळाली की, प्रतिकूल परिस्थितीही शरणागती पत्करते आणि कर्तृत्व उजळून निघते. याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे! लोकमत समूहातर्फे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ नामांकित पुरस्काराने राहुलला गौरविण्यात आले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीनंतर हा पुरस्कार माझ्यासाठी दुग्धशर्करा योग ठरला, असे शाबासकीची थाप मिळालेला राहुल म्हणाला. आता टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविणे, हे माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे स्वप्न आहे. खाशबा जाधव यांच्यानंतर देशाला पदक मिळवून देण्यासाठी टोकियो आॅलिम्पिकमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहे, असा निर्धार राहुलने व्यक्त केला.

'Lokmat Maharashtrian's The Year' award was a donation! | ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार दुग्धशर्करा योग ठरला!

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार दुग्धशर्करा योग ठरला!

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे : टोकियो आॅलिम्पिकमध्ये सर्वस्व पणाला लावणार

जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : गुणवत्तेला प्रामाणिकपणा, शिस्तीबरोबर संधीची जोड मिळाली की, प्रतिकूल परिस्थितीही शरणागती पत्करते आणि कर्तृत्व उजळून निघते. याचे उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे! लोकमत समूहातर्फे ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ नामांकित पुरस्काराने राहुलला गौरविण्यात आले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीनंतर हा पुरस्कार माझ्यासाठी दुग्धशर्करा योग ठरला, असे शाबासकीची थाप मिळालेला राहुल म्हणाला. आता टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविणे, हे माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे स्वप्न आहे. खाशबा जाधव यांच्यानंतर देशाला पदक मिळवून देण्यासाठी टोकियो आॅलिम्पिकमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहे, असा निर्धार राहुलने व्यक्त केला.
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाल्यानंतर राहुलने ‘लोकमत’सोबत गप्पा मारल्या. त्याच्याशी झालेली ही बातचीत...
प्रश्न : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ हा पुरस्कार मिळेल, असे वाटले होते का?
राहुल : हा क्रीडा क्षेत्रासाठी मोठा पुरस्कार आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून हा पुरस्कार आपण जिंकावा ही माझी मनस्वी इच्छा होती. २00९ मध्ये या पुरस्कारासाठी मला नॉमिनेशन मिळाले होते; परंतु त्या वेळेस हा पुरस्कार मिळाला नव्हता. आता तब्बल १0 वर्षांनंतर मला हा पुरस्कार मिळाल्याने माझी इच्छा पूर्ण झाली. हा पुरस्कार माझ्यासाठी दुधात साखर असाच आहे. लोकमत समूह माझ्या प्रतिकूल परिस्थितीतही नेहमीच खंबीरपणे पाठीशी राहिला आहे. त्यामुळे साहजिकच या पुरस्कारचे महत्त्व माझ्यासाठी खूप मोठे आहे. हा पुरस्कार माझ्या कारकीर्दीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
प्रश्न : या पुरस्कारासाठी कोणता दावेदार आव्हान देईल असे वाटले?
राहुल : युवा क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज हे आव्हान असेल, असे मला वाटले होते. कारण क्रिकेट हा भारतात लोकप्रिय खेळ आहे. तथापि, सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे मला हा पुरस्कार मिळाला याचा मला मनस्वी आनंद वाटतोय.
प्रश्न : भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेविषयी तयारी कशी सुरू आहे?
राहुल : सध्या मी नवी दिल्ली येथे होत असलेल्या भारतीय कुस्ती संघाच्या शिबिरात एप्रिल महिनाअखेर होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपची तयारी करीत आहे. सप्टेंबर महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. आॅलिम्पिक कोटा मिळविण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याआधी ट्रायल्स होणार आहेत. परदेशातही प्रॅक्टिसला जाण्याचे माझे नियोजन आहे. तेथे चांगले प्रशिक्षक असतात. त्यामुळे परदेशातील वातावरणाशी जुळवून घेता येणार आहे व तसेच तेथील सरावामुळे अनुभवात भर पडून कौशल्यात प्रगती वाढेल, तसेच आत्मविश्वास उंचाविण्यास मदत होईल.
प्रश्न : खेळाडूंना डोपिंगपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. तू यासाठी काय करतो?
राहुल : कुस्ती हा खेळ खूपच मेहनतीचा आणि खडतर आहे. त्यातच डोपिंगपासून स्वत:ला दूर ठेवण्याचे खेळाडूसमोर एक मोठे आव्हान असते. त्यामुळे मी याविषयी दुसºया कोणावर अवलंबून न राहता स्वत:चे अन्न हे स्वत:च तयार करीत असतो. पहिलवानांसाठी आवश्यक थंडाई, चपात्या, पालेभाज्या व नॉनव्हेज हे सर्व मी स्वत:च तयार करतो.
प्रश्न : १९५२ साली हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये देशाला खाशाबा जाधव यांनी पदक जिंकून दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमी तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.
राहुल : आॅलिम्पिकपदकप्राप्त सुशील कुमार यानेही मला अनेकदा तुझ्यात खूप गुणवत्ता आहे, असे मला अनेक वेळा सांगितले. मात्र, मला योग्य वेळी संधी मिळाली असती तर मी याआधीच आॅलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपही खेळलो असतो. माझ्या कारकीर्दीत अनेकांना मी नमवले. गुणवत्तेला प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्तीची जोड असल्यामुळे मी दहा वर्षांपासून खेळत आहे. स्वत:च्या मेहनतीवर आणि माझ्या गुरूंवर माझा विश्वास आहे. टोकियो आॅलिम्पिक ही माझ्यासाठी करा अथवा मरा, अशीच परिस्थिती आहे. कारकीर्दीत देशाला आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून द्यायचे आहे आणि त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार आहे.
प्रश्न : आतापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम संस्मरणीय क्षण कोणता?
राहुल : माझे गुरू ध्यानचंद पुरस्कारप्राप्त हरिश्चंद्र बिराजदार यांनी मला बालपणापासूनच माझ्यावर आॅलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत तुला पदक जिंकायचे आहे, हे बिंबवले आहे. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यांची ही एक इच्छा मी आता पूर्ण केली आहे. गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांच्या जाण्याने माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठी हानी झाली. यांच्यानंतर अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांनी मला खºया अर्थाने सांभाळले. त्यांनीही मला आॅलिम्पिक व आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी प्रेरित केले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत मी माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांचा फोटो आॅस्ट्रेलियाला घेऊन गेलो होतो. हा फोटो सातत्याने माझ्याजवळच होता. माझ्या गुरूंसाठी आॅलिम्पिक मेडल जिंकणे हेच आता माझ्या कारकीर्द आणि आयुष्यातील स्वप्न आहे आणि ते मी नक्कीच पूर्ण करीन, असा मला विश्वास वाटतो.

Web Title: 'Lokmat Maharashtrian's The Year' award was a donation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.