लोकमत विशेषांक : खुलताबादेतील पुरातन बनी बाग पाहतेय पर्यटकांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:05 AM2021-02-18T04:05:11+5:302021-02-18T04:05:11+5:30

औरंगाबाद शहरापासून २३ कि.मी. अंतरावर खुलताबाद हे तालुक्याचे ठिकाण आहे. भद्रा मारुती मंदिर, शेख जैनोद्दीन चिश्ती दर्गाह, जर जरी ...

Lokmat Special: Tourists wait to see the ancient Bani Bagh in Khultabad | लोकमत विशेषांक : खुलताबादेतील पुरातन बनी बाग पाहतेय पर्यटकांची वाट

लोकमत विशेषांक : खुलताबादेतील पुरातन बनी बाग पाहतेय पर्यटकांची वाट

googlenewsNext

औरंगाबाद शहरापासून २३ कि.मी. अंतरावर खुलताबाद हे तालुक्याचे ठिकाण आहे. भद्रा मारुती मंदिर, शेख जैनोद्दीन चिश्ती दर्गाह, जर जरी जर बक्ष दर्गाह, बुऱ्हाणोद्दीन बाबा दर्गाह, मोगल बादशहा औरंगजेबाची कबर, पहिला निजाम असफशाह यांची कबर, शाही घराण्यातील नसीर खान यांची कबर, अशा अनेक थोरा-मोठ्यांचे चिरनिद्रा घेतलेले हे शहर ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील मोगलकालीन बनीबेगम बाग ही महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र वैभव संवर्धन योजनेत समावेश करण्यात आला आहे. येथे पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मात्र अपुरे पडत आहेत. भारतीय पुरातत्व विभाग व पर्यटन विभागाकडून या बागेत पर्यटकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास वेरूळ लेणी पाहण्यास येणारे पर्यटक येथे नक्कीच भेट देतील.

या बनीबेगम बागेत सुटीचा दिवस वगळता दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नि:शुल्क प्रवेश मिळतो. भव्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश करताच सुंदर झाडे आपलं स्वागत करतात. मुगलकालीन चार बाग पद्धतीवर आधारित या बागेची रचना आहे. बागेच्या मधोमध मध्यवर्ती भागात औरंगजेब बादशाहची नातसून बनीबेगमची कबर आहे. यामुळेच ही बाग बनीबेगम नावाने ओळखली जाते. बागेभोवती सुंदर अशी तटबंदी आहे. या तटबंदीच्या आतील बाजूला कमानी आहेत. मुख्य कबर ही बागेच्या मधोमध असून पृष्ठभागापासून ५ फूट खाली आहे. कबरीच्या चारही बाजूंनी इंडो-परसोनिक शैलीत बनलेली चार घुमटे आहेत. ही घुमटे अष्टकोनी आकाराची असून, आठ स्तंभांवर उभी आहेत. कबरीच्या दालनातील खिडक्या सुंदर कलाकृतीच्या आहेत. येथील छत घुमटाकार आकाराचे असून, त्यावर चुन्याने सुंदर कलाकुसरी केली आहे. पाण्याचे पाट, कारंजे बागेच्या चारही भागांत असून, हे सर्व पाण्याचे स्रोत भूमिगत पाइपलाइनने जोडले आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने ते पाणी संपूर्ण बागेत खेळविले जात होते. कबरीजवळ कारंजातूनही हे पाणी थुईथुई नाचत होते. चार नक्षीदार छत्र्या आपले लक्ष वेधून घेतात. उन्हात, पावसात, वारा सोसत आजही ही कलाकुसर मजबूत आहे. सोळा मोठ्या चौकांतून हा बगीचा उभारलेला आहे. मोगलकालीन बांधणीच्या अप्रतिम पद्धतीने रचना केलेली आढळते. विशेष म्हणजे जेथे कबर आहे तिथे मन शांत, प्रफुल्लित राहून वातावरणातील गांभीर्य टिकेल, अशाच पद्धतीने संपूर्ण बागेची रचना करण्यात आली आहे. काळाच्या ओघात एकमेकांना जोडणारे अंतर्गत रस्ते, चबुतरे, सुशोभीकरणात भर टाकणारी फुले, झाडे, फळझाडे नष्ट झाली आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरातत्व विभाग आणि पर्यटन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बागेचा संपूर्ण विकास, ध्वनीप्रकाश, विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी कारंजे, धर्म तलावात बोटिंग प्रकल्प सुरू केल्यास पर्यटन उद्योगाला चालना तर मिळेलच, त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

कोण आहेत बनीबेगम

खुलताबाद येथील बनीबेगम बगीचाविषयी अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे कोण या बनीबेगम असा प्रश्न समोर उभा राहतो. बनीबेगम या मोगलसम्राट औरंगजेब बादशहाची नातसून होय. औरंगजेबाचा मुलगा आझमशाह, आझमशाहचा मुलगा बेदार बख्त यांची बनीबेगम या पत्नी होत. बनीबेगम अत्यंत सुंदर आणि देखण्या होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेदार बख्तने त्यांच्या निधनानंतर कबरीचा परिसर सुशोभित केला व मोगल उद्यान कलेला अनुसरून बनीबेगम बागेची निर्मिती केली. पूर्वी ही सुंदर बाग पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येत होते. मात्र, कालांतराने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही बाग दुर्लक्षित झाली.

Web Title: Lokmat Special: Tourists wait to see the ancient Bani Bagh in Khultabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.