लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:13 AM2018-01-14T00:13:31+5:302018-01-14T00:13:38+5:30

लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलचे १९ ते २१ जानेवारीदरम्यान शहरात आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील लोकनृत्यांचाही आनंद लुटता येणार आहे. यामुळे तीन दिवस शहरवासीयांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

Lokmat Times Food Festival | लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल

लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल

googlenewsNext
ठळक मुद्देपर्वणी : दहा राज्यांतील कलावंत सादर करणार लोकनृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलचे १९ ते २१ जानेवारीदरम्यान शहरात आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील लोकनृत्यांचाही आनंद लुटता येणार आहे. यामुळे तीन दिवस शहरवासीयांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलबद्दल शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कधी एकदा फेस्टिव्हल सुरू होतो आणि आम्ही विविध लज्जतदार पदार्थांवर ताव मारतो, अशी तीव्र इच्छा खवय्यांमध्ये निर्माण झाली आहे. या फूड फेस्टिव्हलचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी आयोजकांनी विविध राज्यांतील लोकनृत्य कलाकारांनाही आमंत्रित केले आहे. यामुळे आता प्रत्येक राज्यातील नावीन्यपूर्ण खमंग, चटपटीत खाद्यपदार्थांची चव चाखत असताना दुसरीकडे त्या-त्या राज्यांतील लोकनृत्यही पाहण्यास मिळणार आहे. शहरवासीयांसाठी हा दुर्मिळ दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
यासंदर्भात फूड फेस्टिव्हलच्या आयोजिका आशू दर्डा यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक राज्यात आपली खाद्यसंस्कृती, लोककलेची महान परंपरा आहे. खास शहरातील खवय्यांसाठी या विविध राज्यांतील लोकप्रिय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच त्या राज्यातील लोकसंगीत, लोकनृत्य तेथील विशिष्ट पारंपरिक वेशभूषा, तसेच त्या भूमीचे वैशिष्ट्ये काय आहे, याची माहिती खवय्यांना याच प्रदर्शनात मिळणार आहे. प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थ व तेथील लोकसंगीत व लोकनृत्य, यामुळे आपण प्रत्यक्षात त्या राज्यातच आलो की काय, असा भास शहरवासीयांना होईल, असे नियोजन फेस्टिव्हलमध्ये करण्यात येत आहे.
तसेच वेगवेगळ्या राज्यांतील शेफलाही यानिमित्ताने खास आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे त्या राज्यातील अस्सल खाद्यपदार्थाची चव खवय्यांना मिळेलच. शिवाय आवडीनुसार वेगवेगळ्या लोकनृत्याचा आनंदही घेता येणार आहे.
वेगवेगळ्या राज्यांतील कलावंतांना आमंत्रित करण्यासाठी ज्यांनी आयोजकांची मदत केली ते राजेश पटेल यांनी सांगितले की, फूड फेस्टिव्हलच्या निमित्ताने पहिल्यांदाच शहरात वेगवेगळ्या राज्यांतील लोककलावंत येत आहेत. यात गुजरातचे गोफ नृत्य, पंजाबचा भांगडा, राजस्थानचे अग्नी भवई नृत्य आदी नृत्य प्रकारांचा समावेश असणार आहे.

300खाद्यपदार्थांची मेजवानी
लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल क्रांतीचौक येथील मनोर हॉटेलच्या लॉनवर होणार आहे. यात वेगवेगळ्या राज्यांतील ३०० खाद्यपदार्थांचा आस्वाद तेही एकाच छताखाली घेता येणार आहे. औरंगाबादच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील खाद्यप्रेमींसाठी फेस्टिव्हल पर्वणी ठरणार आहे.

Web Title: Lokmat Times Food Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.